संकेतस्थळावर अश्लील मजकूर टाकणाऱ्या महिलेस अटक

संकेतस्थळावर एका महिलेबाबत अश्लील मजकूर टाकून तिची बदनामी केल्याच्या आरोपावरून दुसऱ्या महिलेस सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

संकेतस्थळावर एका महिलेबाबत अश्लील मजकूर टाकून तिची बदनामी केल्याच्या आरोपावरून दुसऱ्या महिलेस सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
अंजली प्रवीण अमोलिक उर्फ किरण श्याम इदनानी (वय ४६, रा. चेतना अपार्टमेन्ट, लष्कर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. त्यांची प्रवीण अमोलिक यांच्याशी ओळख झाली. अमोलिक यांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पीडित महिलेच्या पतीला जमीन खरेदी करायची असल्याने त्यांच्यात ओळख झाली. त्याचबरोबर पीडित महिला व आरोपीचीही ओळख झाली. काही दिवसांनंतर आरोपीने पीडित महिलेस, तुझ्या पतीचे अनेक महिलांशी संबंध आहेत,त्यामुळे तू त्याला सोडून दे असे सांगितले. मात्र, पीडित महिलेने न ऐकल्यामुळे आरोपीने त्याना बरबाद करण्याची धमकी दिली. संकेतस्थळावर एक ब्लॉग सुरू करून त्याच्यावर पीडित महिलेबाबत अश्लील मजकूर टाकला. पीडित महिलेवर गुन्हा दाखल असून ती फरार आहे, पोलिसांनी तिच्यावर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवल्याचे संकेतस्थळावर टाकले. या सर्व प्रकाराचा पीडित महिलेस खूप त्रास झाला. तिने सायबर शाखेकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गोपीनाथ पाटील यांनी पहाणी करून आरोपीचा तपास केला. त्यानंतर सहकारनगर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर हे अधिक तपास करीत आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Misuse of website

ताज्या बातम्या