मोबाइलवरूल ‘व्हॉट्स अप’ या सोशल मीडियावर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी देऊन संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांकडून साडेचार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अक्षय संजय भुरके (वय २०, रा. सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीच्या बहिणीने याबाबच तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही कोल्हापूरची आहे. भुरके व तिची सांगली येथे एका विवाहात ओळख झाली होती. त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेतले होते. त्यानुसार काही दिवस त्यांचे संभाषण होत होते. तरुणीच्या मोबाइलवरून एक दिवशी चुकून तिचे स्वत:चे फोटो भुरके याच्या मोबाइलवर गेले. हे फोटो आक्षेपार्ह होते. त्यानुसार त्याने हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन सुरुवातीला साडेचार लाख रुपयांची मागणी केली. तरुणीच्या बहिणीला त्याने हे फोटो पाठविले व कुटुंबीयाला बदनाम करण्याची धमकी दिली.
भुरके याने सांगितल्यानुसार १२ डिसेंबरला १५ हजार रुपयांची रक्कम अजित चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या ओरिएन्टल बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर भुरके याने दुसरा हप्ता म्हणून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी पुण्यात भेटू असेही सांगितले. त्यानुसार फग्र्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांची भेट ठरली. तरुणीची बहीण व भाऊ हे दोघे पुण्यात आले. त्यांनी डेक्कन पोलीस ठाणे गाठले व तेथे भुरके याच्याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा लावून भुरके याला अटक केली.