पुणे : सध्याच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या, मोबाइलच्या युगात विद्यार्थ्यांना पुन्हा मातीशी जोडण्यासाठी एमआयटी शिक्षण संस्थेतर्फे अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. दौंडनजीक बोरीबेल येथे जीवन परिवर्तन केंद्र (लाइफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर) उभारण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आरोग्याची जोपासना, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सात दिवसांचा निवासी अभ्यासक्रम या केंद्राच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.
केंद्राचे संचालक प्रा. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, डॉ. श्रुती निगुडकर, डॉ. दत्ता दंडगे या वेळी उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, आध्यात्मिक गुरू रामदेव बाबा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन १२ मार्च रोजी करण्यात येणार आहे. १५०एकरपेक्षा अधिक कार्यक्षेत्रामध्ये या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
प्रा. कराड म्हणाले, ‘आताच्या काळात शिक्षणाला जीवनमूल्ये, दृष्टिकोनाची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जीवन परिवर्तन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. शेती आणि निसर्ग, शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ, संघनिर्माण आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण, अध्यात्म आणि शांती या घटकांचा विचार त्यामागे आहे. उच्च शिक्षणातील हा अत्यंत वेगळा प्रयोग आहे. केंद्राच्या माध्यमातून द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांचा निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांच्या काही तुकड्या करून त्यांच्यासाठी अभ्यासक्रम राबवण्यात आला. सात दिवसांत विद्यार्थ्यांना सात दिवस मोबाइलविना या केंद्रात राहावे लागते. पहाटे लवकर उठून व्यायामापासून शेतीची कामे करण्यापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्यात येणार आहेत. किमानता हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांना एकाग्र होण्यासाठी, जीवनाकडे पाहण्यासाठी प्रवृत्त करण्याचा विचार या केंद्राच्या उभारणीमागे आहे. सुरुवातीला एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या काळात अन्य विद्यापीठेही या केंद्राचा वापर करू शकतील.
आजच्या डिजिटल युगात वेगवान जीवनशैली, सतत माहितीचा मारा, स्पर्धेचा ताण यामुळे तरुणांचा निसर्ग, समाज अणि स्वतःच्या अंतर्मनाशी असलेला संबंध कमी होत आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भान देण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. चिटणीस यांनी सांगितले.
