पुणे : शाश्वत ऊर्जा उपाययोजनेच्या दृष्टीने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने लिथियम आयन आणि सोडियम आयन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्याधुनिक बॅटरी निर्मिती आणि संशोधन केंद्र स्थापन केले आहे. संपूर्ण बॅटरी विकसित करण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली असून, त्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या काही वर्षांत स्वच्छ ऊर्जा निर्मिती, पर्यायी इंधनासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन, प्रयोग करण्यात येत आहे. त्यात बॅटरी निर्मिती हा महत्त्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने बॅटरीच्या संपूर्ण विकासासाठी केंद्राची रचना करण्यात आली आहे. सक्रिय घटकांचे संश्लेषण, कॉइन सेल निर्मिती आणि इलेक्ट्रोकेमिकल कार्यक्षमतेचे मूल्यमापन अशा सर्व प्रक्रिया अंतर्गत पातळीवर पार पाडण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध आहे.
बॅटरी निर्मिती व संशोधन सुविधा ही केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या योजनांना पूरक ठरू शकणार आहे. खासगी राज्य विद्यापीठात पहिल्यांदाच अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. या केंद्राची स्थापना हा शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानाबाबतचा महत्त्वाचा टप्पा आहे. लिथियम-आयन, सोडियम-आयन आणि लिथियम-सल्फर बॅटऱ्यांसाठी प्रगत इलेक्ट्रोड साहित्य या केंद्रात विकसित करण्यात येत आहे. तसेच एमआयडी स्वीडनच्या सहकार्याने कागदी बॅटऱ्यांवरही संशोधन सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे शैक्षणिक, औद्योगिक सहकार्याला चालना मिळण्यासह भावी तंत्रकुशल मनुष्यबळ मिळणार आहे. राष्ट्रीय संस्थांकडून सहकार्य मिळाल्यास स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी अधिक योगदान देणे शक्य आहे, असे विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन मटेरियल्स सायन्सचे संचालक डॉ. भारत काळे यांनी सांगितले.