पुणे : ‘नजिकच्या काळात जगभरात साधारण साडेचार कोटी ‘ग्रीन कॉलर’ नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता विविध अभ्यासांतून वर्तवण्यात येत आहे. हेच भविष्य आहे. त्यादृष्टीने आपण आपल्या मुलांना आतापासूनच तयार करायला हवे,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘गेल्या काही काळात राष्ट्रीय हरित लवादाने देशातील विविध सरकारी संस्थांना सुमारे ८० हजार कोटी रुपयांचा दंड सुनावला. आता असे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर, पर्यावरणपूरक व्यवसाय उभारावे लागतील. मात्र, अशा प्रकारच्या ‘ग्रीन कॉलर’ नोकऱ्या करण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

भवताल फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात सावंत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास अकादमीचे (यशदा) अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, विद्यार्थी सहायक समितीचे प्रभाकर पाटील, ‘भवताल’चे संस्थापक अभिजित घोरपडे या वेळी उपस्थित होते.

सावंत म्हणाले,‘पूर्वी भारतातून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आपल्या मुला-मुलींना अमेरिकेत जाता येईल का, हा प्रश्न पुण्यातील पालकांना पडतो आहे. मात्र, सध्या विकसित देशांसह जगभरात ‘ग्रीन कॉलर’ नोकऱ्या करणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होत आहे. आपणही तशी कौशल्ये विकसित केल्यास अनेक प्रकारच्या नव्या संधी खुल्या होतील.’

‘केंब्रीज, ऑक्सफर्ड ही विद्यापीठे कोणत्या व्यक्तीच्या नावाने ओळखली जात नाहीत. साहित्याचेही तसेच असते. चांगल्या दर्जाचे साहित्य वैक्तिकतेच्या पलीकडे जाणारे असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बाह्य माहितीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक स्पष्टतेने काम करणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

प्रा. करमळकर म्हणाले,‘पर्यावरण, भवतालाकडे पाहण्याची संवेदना निर्माण करण्यात आपण कमी पडत आहोत. त्याला आपल्या शिक्षण पद्धतीमधील दोष कारणीभूत आहेत. नव्या शिक्षण धोरणात भारतीय ज्ञान परंपरेसारखे विषय आणले गेले. मात्र, शिक्षकांनाच भारतीय ज्ञान परंपरेची माहिती नसते. त्यामुळे सर्वात आधी पर्यावरण, भारतीय भारतीय ज्ञान परंपरा यांवर आधारित साहित्याची निर्मिती व्हायला हवी.’ विद्यार्थ्यांमध्ये भवतालाचे कुतुहल निर्माण करण्याची चळवळ निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले,‘ स्थानिक खनिजे, दुर्मिळ ठेवा यांच्या नोंदी करायला हव्यात. त्यानंतर धोरणात्मक पातळीवर निर्णय घेणे सहज शक्य होईल. या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी, महिलांना सहभागी करून घ्यायला हवे.’ नव्या पिढीमध्ये कुतूहल जागे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजीत सोनवणे यांनी सूत्रसंचालन, तर अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.

‘मुलांना बोलायचे आहे’

‘‘एमकेसीएल’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठीतून बोलणारा ‘क्रांती’ हा ‘एआय चॅटबॉट’ बनवला होता. त्यावर एका आठवड्यात गावखेडयातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी संवाद साधला. मुलांना बोलायचे आहे. त्यांच्यामध्ये कुतूहल आहे, जिज्ञासा आहे. मात्र, त्यांच्याशी बोलायला कुणाकडेही वेळ नाही,’ अशी खंत विवेक सावंत यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना आशयाबरोबरच अनुभवावर आधारित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, मुलांनी स्वतः अनुभवातून शिक्षण घेतले आहे का, हे तपासणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.