राज्यातील कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य करुन मैदाने सुरू करा – आमदार महेश लांडगे

करोना काळात राज्यातील कुस्ती आखाडे आणि मैदानांसह भरवण्यात येणाऱ्या स्पर्धा बंद आहेत

भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांची मागणी

करोना काळात राज्यातील कुस्ती आखाडे आणि मैदानांसह भरवण्यात येणाऱ्या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचा गौरव म्हणून ओळखली जाणारी कुस्ती सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील आखाडे सुरू करावेत. तसेच, कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, करोना महामारीमुळे सर्वच घटकांतील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या कुस्तीलाही करोनामुळे गेल्या दीड वर्षापासून टाळेबंदीचा सामना करावा लागत आहे. यासह यात्रा, जत्रा, उरुसातील मैदाने रद्द करण्यात आली आहेत. परिणामी, कुस्तीपटू मल्लांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

महाराष्ट्रातील खेळाडू निराधार

दुसरीकडे, पंजाब व हरियानासारख्या राज्यांमध्ये कुस्तीची मैदाने आयोजित केली जात आहेत. तसेच, चांगले बक्षीस देखील ठेवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांनी आता उत्तर भारताची वाट धरली आहे, असे चित्र आहे. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरचे आखाडेही बंद आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी जगभरातील मल्लांना राजाश्रय दिला. पण, आता महाराष्ट्रातील खेळाडू अक्षरश: निराधार झाले आहेत. पूर्वी उत्तर भारतातील मल्ल सरावासाठी कोल्हापूरमध्ये दाखल होत असत. पण, आता कोल्हापूर सांगली, सोलापूर आणि पुणे परिसरातील मल्लांना पंजाब, हरियाणाची वाट धरावी लागत आहे.

कर्नाटकात कुस्ती स्पर्धा सुरू मग, महाराष्ट्रात का नाही!

विशेष म्हणजे, शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकमध्येही कुस्तीची मैदाने सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मल्ल कर्नाटकात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. कर्नाटकात कुस्ती स्पर्धा सुरू झाल्या आहेत. मग, महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न कुस्ती क्षेत्राला पडला आहे. तसेच, अर्थिक चणचण असल्यामुळे आपल्यापेक्षा तगड्या मल्लांसोबत दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रातील मल्ल तयार होतात. मात्र, सर्वच मल्लांना परराज्यात जावून सराव करणे किंवा स्पर्धेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्ती आखाडे आणि मैदाने सुरू करावीत, अशी कुस्तीक्षेत्राची मागणी आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील मल्लांना उभारी मिळेल, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mla mahesh landage start the field providing financial support to wrestlers in state kjp 91 srk