पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शहरात प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया केंद्र उभारावे. कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कालबद्ध उपाययोजना कराव्यात. मोशीतील नागरिकांचे आरोग्य आणि इंद्रायणी नदी संरक्षणाला प्राधान्य देण्याबाबत महापालिका प्रशासन, राज्य शासनाकडे आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी मोशीकरांना दिली.
मोशीतील ग्रामस्थ व नागरिकांनी आमदार लांडगे यांची भेट घेऊन कचरा डेपोशी संबंधित अडचणी मांडल्या आणि उपाययोजनांच्या मागण्यांचे निवेदन दिले. मोशी कचरा डेपोवरील वाढत्या भारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. डेपोची क्षमता संपत असल्याची चिंता व्यक्त करताना, त्याची सद्य:स्थिती, पर्यावरणीय परिणाम आणि कार्यपद्धतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, नगरसेविका अर्चना सस्ते, सारिका बोऱ्हाडे, सुजाता बोराटे, सारिका गायकवाड, सोसायटी फेडरेशनेचे संजीवन सांगळे या वेळी उपस्थित होते.
संपूर्ण शहरातील कचरा एकाच ठिकाणी आणून साठविण्याच्या व्यवस्थेऐवजी कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करावे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र, आधुनिक आणि शास्त्रोक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारावीत. ओला, सुका आणि इतर कचऱ्याच्या उगमस्थानी वर्गीकरण व स्वतंत्र प्रक्रिया बंधनकारक करून मोशी डेपोवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. तसेच, कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित द्रव इंद्रायणी नदीत मिसळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
