पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात उमेदवारीबाबत गोंधळ कायम राहिला आहे. या पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार, शहराध्यक्ष सुनिल टिंगरे यांनीही अर्ज दाखल केला आहे. दोघांनाही पक्षाने ‘एबी फॉर्म’ दिला आहे. चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतरच नक्की उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार आहे.

या मतदार संघावरून सुरुवातीला भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ यांच्यात उमेदवारीवरून वाद झाला. ही जागा ‘राष्ट्रवादी’ची असली, तरी भाजपने या जागेवर दावा केला होता. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा ‘राष्ट्रवादी’ ला मिळाली आहे. आता उमेदवारीवरून गोंधळ निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी अंतिम मुदत असताना उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली. भाजपचे माजी खासदार संजय काकडे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात रविवारी रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर खासदार काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे या दोघांनी सोमवारी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’मध्ये नाराजी पसरली. माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनिल टिंगरे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला. त्यामुळे दोघांनाही पक्षाने ‘एबी फॉर्म’ दिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चार जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यावेळी कोणाला उमेदवारी मागे घेण्याचा आदेश पक्षाकडून दिला जाणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून श्रीकांत पाटील उमेदवार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार श्रीकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे असलेल्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाशीही संपर्क आहे. त्या मतदारांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मदार असणार आहे. चार जूनला काकडे की टिंगरे, यापैकी कोण उमेदवार असणार हे निश्चित झाल्यानंतर या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.