पिंपरी : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) चिंचवडमधील मोहननगर येथील भूमिगत गॅस पाइपलाइनमध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसर हादरला. दगड-गोटे उडून एक दगड दुचाकीचालकाच्या छातीवर लागला. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही.

एमएनजीएल कंपनीने मोहननगर परिसरात सर्व मुख्य रस्ते आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम केले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकात एका रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक रस्त्याखालून प्रचंड धूर येऊन मोठा स्फोट झाला.

स्फोटाच्या आवाजाने हादरा बसला आणि जमिनीखालून दगड-गोटे उंच उडाले. त्याच वेळी एक दुचाकीचालक तेथून जात असताना त्याच्या छातीवर एका दगडाचा मार बसला. मोठी दुखापत झाली नाही. स्फोटाच्या जागेवर मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर लहान मुले, महिला, तसेच ज्येष्ठांची सतत वर्दळ असते. घटना घडली त्या वेळी सुदैवाने रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सांगितले.

दरम्यान, या स्फोटाची चौकशी करून कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक भापकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, परमेश्वर कांबळे, दत्ता वाघमोडे यांनी पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्याकडे केली.