सतत एकमेकांविरोधात टीका टिपण्णी करणाऱ्या शिवसेना-मनसे नेत्यांच्या भुमिका असताना. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आज चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या मदतीला धावून आली. यासाठी निमित्त ठरले एक संगणक.

गेल्या ५ ते ६ दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या कार्यालयातील संगणक महापालिकेने काढून घेतला आहे. परंतू, असे का करण्यात आले यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता संगणक काढून घेण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, लवकरात लवकर हा संगणक महापालिकेतील शिवसेना कार्यालयात बसविण्यात यावा व गटनेत्याना उचित सन्मान मिळावा यासाठी आज महापौरांना मनसे शहराध्यक्षांकडून निवेदन देण्यात आले. या एका शुल्लक कारणामुळे का होईना शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे आज पहायला मिळाले.

महापौरांना मनसे शहराध्यक्षांकडून निवेदन देण्यात आले.

शिवसेनेकडून पालिकेची निवडणूक लढलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर भाजपचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणत आहेत. भापकर यासाठीची निवेदने आणि प्रेस नोट सेना कक्षातील संगणकावर तयार करत होते, म्हणूनच भाजपच्या आदेशावरून शिवसेनेच्या कक्षातून प्रशासनाने संगणक हटवला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.