मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा,” असं आवाहन केलंय. तसेच आत्ता रमजान सुरू आहे, त्यामुळे मला कोणतीही गोष्ट करायची नाही, पण ३ मेपर्यंत समजलं नाही तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे, असंही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते सध्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मला दोन घोषणा करायच्या आहेत. त्यासाठी मीही पत्रकार परिषद घेतली. देशभरातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. त्याकडे तसंच पाहिलं पाहिजे. एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना सांगितलं की माझं लहान मुल जन्माला आलं तेव्हा सकाळच्या अजाण आणि बांग बंद करण्याबाबत मशिदीत जाऊन सांगितलं होतं. त्याचा लहान मुलाला त्रास होत होता. हा केवळ हिंदूना नाही तर मुस्लिमांना देखील त्रास होतो.”

“तुम्ही जर दिवसातून पाचवेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही…”

“तुम्ही जर दिवसातून पाचवेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही दिवसातून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. आत्ता रमजान सुरू आहे. त्यामुळे मला कोणतीही गोष्ट करायची नाही, पण त्यांना ३ मेपर्यंत काही समजलं नाही, त्यांना या देशातील कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, लाऊड स्पिकर वाटत असेल, तर मला वाटतं जशास तसं उत्तर देणं देखील गरजेचं आहे,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा; पाच जूनला रोजी अयोध्येला जाणार

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरू आहे. या महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नको आहेत. या देशातील महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाही, तशी इच्छा देखील नाही. माणुसकी म्हणून मुस्लीम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. त्यांना वाटत असेल की लाऊड स्पिकरवरच ऐकवणार, तर मग आमच्या आरत्या देखील त्यांना लाऊडस्पिकरवरून ऐकाव्या लागतील,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.