Video : अखेर राज ठाकरेंनी मास्क घातला! पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा मास्क घालत नसल्याचं सांगितलं असताना आज पहिल्यांदाच त्यांनी मास्क लावल्याचं दिसून आलं आहे.

raj thackeray wear mask while meeting with babasaheb purandare
राज ठाकरेंनी अखेर मास्क घातला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याची आजपर्यंत अनेकदा चर्चा झाली. अजूनही अधून-मधून होत असते. अनेकदा जाहीरपणे राज ठाकरेंनी “मी मास्क घालत नाही”, असं स्पष्टपणे सांगितलं देखील आहे. मात्र, अखेर आज पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर मास्क दिसला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची राज ठाकरेंनी पुण्यात भेट घेतली. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी बोलताना राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्या या भेटीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या मास्कची चर्चा सोशल मीडियावर देखील सुरू झाली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची घेतली भेट!

राज ठाकरेंनी आज पुण्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली. ठाकरे घराण्याचे बाबासाहेब पुरंदरेंशी असलेले कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे आज देखील राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण एरवी कुठेही मास्क न घालता जाणारे राज ठाकरे यावेळी मात्र बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेताना मास्क लावून बसलेले दिसले.

मी मास्क घालत नाही, राज ठाकरेंनी केलं होतं स्पष्ट

राज ठाकरेंना याआधी अनेकदा विनामास्क पाहिलं गेलं आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात जेव्हा राज्यातील करोनाचे रुग्ण वाढत होते, तेव्हा बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील राज ठाकरे मास्क न घालताच पोहोचले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे विनामास्क दिसले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न घालण्याचं कारण विचारलं असता मी मास्क घालत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.

…म्हणून मी मास्क न लावता बैठकीला पोहोचलो, राज ठाकरेंनी दिलं उत्तर

मास्क घालण्याचा तिरस्कार नाही, पण…

दरम्यान, राज ठाकरे मास्क का घालत नाहीत? याविषयी लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी यावर उत्तर दिलं होतं. “मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं. शिवाजी पार्कात मी पाहिलं तर अनेक लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही”, असं ते म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns chief raj thackeray wear mask first time while meeting babasaheb purandare pmw