जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील वसंत मोरे यांच्या कामाची दखल

मागील दीड वर्षापासुन करोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून अशीच परिस्थिती आपल्या देशात देखील आहे. या संपूर्ण संकटाच्या कालावधीत नागरिकांच्या मदतीसाठी डॉक्टर, पोलिस, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था पुढे येऊन काम करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. त्याच दरम्यान पुण्यातील मनसेचे विद्यमान नगरसेवक आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे हे करोना बाधित रुग्णांसाठी अविरतपणे काम करताना सर्वांनी पाहिले आहे. या त्यांच्या कामाची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल घेण्यात आली असून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्मध्ये नोंद घेतल्या बद्दल वसंत मोरे यांच्याशी लोकसत्ता ऑनलाईन च्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, मागील दीड वर्षापासून आपण सर्व जण करोना महामारी आजाराचा सामना करीत आहोत. या कालावधीत अनेक नागरिकांना करोना आजाराची बाधा झाली. त्यावेळी अनेकांना रुग्णालयात जागा मिळत नव्हती. तर आपल्याकडे उपचारासाठी साधने अपुरी होती. तर काहींना उपचाराचा खर्च परवडत नव्हता. प्रत्येकाला चांगले उपचार मिळावेत, या प्रश्नावर मी आणि माझ्या सहकार्यांनी लढा उभारून, चुकीच्या कामाविरोधात प्रशासनाला जाब विचारण्याचे काम केले. यामुळे अनेकांना याचा फायदा झाला. तर त्याच दरम्यान आम्ही एक कोविड रुग्णालय सुरू केले. यातून हजारो रुग्णावर उपचार करण्यात आले, अनेक जण घरी बरे होऊन गेलेत.
त्याच दरम्यान गरजू नागरिकांना अन्न धान्य, बेघर नागरिकांना तयार जेवणाचे पाकीट देण्याचे काम आजवर केले आहे. या सर्व कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेकडून घेण्यात आली आहे.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मार्फत प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, राजकीय जीवनात काम करताना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आल्याने, आणखी जबाबदारी वाढली असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.