मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याजागी मनसेचे नगरसेवक आणि पालिकेतील मनसे गटनेते साईनाथ बाबर यांच्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर स्पीकर्स लावून त्यावर हनुमान चालिसा चालवण्याची भूमिका राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला घेतली होती. त्याविरोधी भूमिका घेतल्यामुळेच वसंत मोरेंवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रामध्ये सूचक सल्ला दिला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेनं साईनाथ बाबर यांच्याबाबत केली घोषणा

मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

“…याची आपण नोंद घ्यावी!”

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सहीनिशी साईनाथ बाबर यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये सूचक सल्ला देण्यात आला आहे. वसंत मोरे यांच्या प्रकरणामुळेच हा सल्ला देण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेनं राबवावी आमि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी”, असं या पत्रात बजावण्यात आलं आहे.

“आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल, हीच अपेक्षा. आफली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल”, असं देखील या पत्रात खाली नमूद करण्यात आलं आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणं वसंत मोरेंना भोवलं? मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी!

वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, “मी अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद राज ठाकरे यांच्यकडून मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray warns pune leader sainath babar after vasant more removed pmw
First published on: 07-04-2022 at 14:36 IST