MNS welcomes MP Brijbhushan Singh visit MNS stance of non opposition pune print news apk 13 ysh 95 | Loksatta

पुणे: खासदार ब्रिजभूषण सिंहांच्या दौऱ्याचे ‘मनसे’ स्वागत; विरोध न करण्याची मनसेची भूमिका

भारतीय जनता पक्षाबरोबरील वाढती जवळीक, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर सावध भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

पुणे: खासदार ब्रिजभूषण सिंहांच्या दौऱ्याचे ‘मनसे’ स्वागत; विरोध न करण्याची मनसेची भूमिका
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पुणे: उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नियोजित पुणे दौऱ्याला तूर्त विरोध न करण्याची भूमिका शहर मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरील वाढती जवळीक, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर सावध भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आयोजक संस्कृती प्रतिष्ठानचे संयोजक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निमंत्रित केले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनीही निमंत्रण स्वीकारले असून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा >>> पुणे: वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरेंची मध्यस्ती?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर काही कारणास्तव राज यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.

हेही वाचा >>> कोरेगाव भीमा स्तंभ अभिवादन दिनाच्या नियोजनावरून बार्टीवर होणारे आरोप तथ्यहीन

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर काय करायचे ते जाहीर केले जाईल, असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नियोजित दौऱ्याला विरोध न करण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, त्याचप्रमाणे कुस्तीचेही काही नियम आहेत. पराभवनानंतर पैलवान एकमेकांशी हस्तांदोलन करतात, गळाभेट घेतात. महाराष्ट्राच्या या संस्कृतीप्रमाणे ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करण्यात येणार नाही, असे मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर

राज्यातील सत्ता संघर्षानंतर राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक अशी राहिली आहे. भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटी होत आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजपबरोबर हातमिळवणी केलेल्या एकनाथ शिंदे गटाबरोबरही मनसेची जवळीक वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे युतीमध्ये येईल, अशी चर्चाही होत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत एकमेकांना दुखवायचेही नाही आणि जास्त जवळही जायचे नाही, अशी रणनीती मनसेची आहे. निवडणुकीनंतरची सत्ता समीकरणे जुळविण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळेच ब्रिजभूषण सिंह दौऱ्याला विरोध होणार नाही, अशी चर्चा मनसेमध्ये आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 20:50 IST
Next Story
पुणे: वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरेंची मध्यस्ती?