वाचनसंस्कार घडावा म्हणून धडपडणाऱ्या सरोज टोळे यांनी दृष्टिहीनांनादेखील वाचता यावे, म्हणून मुलांपासून मोठ्यांना वाचायला आवडतील अशा अनेकानेक पुस्तकांचे प्रकाशन ब्रेलमध्ये केले. ब्रेलमध्येच ‘फुलोरा’ नावाचा दिवाळी अंकही त्या प्रकाशित करू लागल्या. अलीकडेच ब्रेलमध्ये तयार केलेल्या मुलांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन झाले. या निमित्ताने त्यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
ब्रेलमधील पुस्तके प्रकाशित करण्यामागची प्रेरणा काय होती?
- ब्रेलमध्ये पुस्तके प्रकाशित करण्यामागची प्रेरणा म्हणजे एक ‘दृष्टिहीन परी’. तिने आमच्यासारख्यांना वाचायला मिळावे, यासाठी काही तरी करा ना, असे सांगितले. त्यानंतर तिच्यासह, तिच्यासारख्या अनेकांचे आणि पर्यायाने माझे भावविश्व बदलले. मी या मुलांसाठी ब्रेलमध्ये पुस्तके प्रकाशित करायचे ठरवले. त्यासाठी ब्रेल लिपी शिकले. सहा महिन्यांनी बडबड गीतांपासून कविता, कथा, गोष्टी, गाणी, श्लोक ब्रेलमध्ये तयार करत गेले. मोठ्या वयाच्या दृष्टिहीनांसाठी निवडक कविता, लेख, चरित्रे, गजानन विजय, गुरुचरित्र, भगवद्गीता, संत तुकाराम महाराजांचे संक्षिप्त चरित्र मराठीबरोबरच सिंधी, कन्नड भाषांमध्येही ब्रेलमध्ये आणले. पौराेहित्य करणाऱ्यांसाठी आवश्यक पूजांची पुस्तकेदेखील ब्रेलमध्ये आणली.
- प्रतिभा सेनगुप्ता या माझ्या गुरुमैत्रिणीमुळे मी आधी मुलांसाठी, नंतर मोठ्यांसाठी ब्रेलमधील ‘फुलोरा’ हा अंक १६ वर्षे प्रकाशित केला. या अंकासाठी ब्रेल शिकलेल्या माझ्या मैत्रिणी मला मदत करायच्या. ‘पुणे बुक फेअर’मध्ये १६ वर्षे आम्ही सहभागी होत होतो. त्या प्रदर्शनातून या अंकासह ब्रेलमधील पुस्तकांची ओळख जनमानसाला करून दिली. या धडपडीतून अनेक दृष्टिहीन वाचक आणि लेखकही घडले.
तुम्ही वाचनाकडे कसे वळालात?
- लहानपणापासूनच वडिलांनी मला वाचनाची सवय लावली. वडील शाळाप्रमुख आणि व्याकरणकार. शाळेच्या वाचनालयासाठी लागणारी पुस्तके ते मे महिन्यात मागवायचे. घरात पुस्तकांची थप्पीच्या थप्पी लागलेली असायची. त्यांतून पुस्तके निवडायची आणि जी घ्यायची नाहीत ती न घेण्यामागचे कारण द्यायचे, हे माझे काम होते. त्यामुळे सगळी पुस्तके वाचली जायची. शिवाय मोठेपणीसुद्धा विविध दिवाळी अंक घरी यायचे. ते सर्वच वाचून काढायचे. त्यातून वाचनाचे वेड वाढत गेले.
- वडिलांचे साहित्यिक मित्र घरी यायचे. लग्न झाल्यावर मी कोलकात्याला गेले. पती सुधीर आणि दीर प्रकाश उत्तम बंगाली बोलायचे. मीही बंगाली बोलू, लिहू, वाचू लागले. बंगालीतील छोट्यांच्या गोष्टींचे मराठीत भाषांतर केले. लहान मुलांनी वाचावे, चांगले लिहावे म्हणून ‘वंचित विकास’तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘निर्मळ रानवारा’ मासिकाची संपादक झाले, तेव्हा या कथा आम्ही मासिकातून प्रसिद्ध केल्या. त्या काळात मुलांनी वाचावे म्हणून मुलांकडून लिहूनही घेतले आणि प्रसिद्धही केले. साहित्याचे विविध प्रकार या अंकात हाताळले. मुले वाचत गेली, लिहित गेली. लेखक आणि वाचक दोन्ही वाढले.
इतरांचे वाचन, लेखन वाढावे यासाठी कसे प्रयत्न केलेत? - सर्वांनीच वाचावे, लिहावे यासाठी शिबिरे आयोजित केली. स्वतःजवळ असलेली पुस्तके, वडिलांजवळचे वाङ्मय, ज्ञानकोश, शब्दकोश, संस्कृतिकोश, विश्वकोश, संदर्भग्रंथ शाळांच्या ग्रंथालयांना भेट दिले. कपाटात बंद राहण्यापेक्षा त्याला वाचकांचा स्पर्श मिळाला पाहिजे या एकाच अटीवर मी ज्ञान पुढे दिले.
नववर्षात कोणता संकल्प सोडता येईल?
- ज्ञानसमृद्ध व्हायचे असेल, तर वाचन आवश्यक आहे. दृष्टिहीन मंडळी वाचनासाठी, पुस्तकांना स्पर्श व्हावा म्हणून ब्रेल शिकतात, खूप वाचतात. डोळस मंडळींना तर सहजच वाचन करता येऊ शकते. मोबाइलवर रमण्यापेक्षा सहजतेेने मिळणारा पुस्तकस्पर्श आणि त्यातून मिळणारा आनंद, ज्ञान सतत ग्रहण करायला हवा. पुस्तके वाचूनच हे मिळते, ती कपाटात बंदिस्त करून ठेवून नाही, हे लक्षात ठेवायला हवे. स्वतः भरपूर वाचन करण्याबरोबरच इतरांना प्रोत्साहित करणे ही काळाची गरज असल्यामुळे तोच संकल्प सोडता येईल.
shriram.oak@expressindia.com
