पुणे : विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळी विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का ) कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी टोळीप्रमुख रोहन अशोक गायकवाड (वय २५, रा. फलके चौकाजवळ, कलवड वस्ती, लोहगाव) याच्यासह आठ साथीदारां विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. रोहन गायकवाड आणि साथीदारां विरोधात विमानतळ, येरवडा, चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, लूट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गायकवाड टोळी विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी तयार केला होता.

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ८५ गुंड टोळ्यां विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. सहायक आयुक्त किशोर जाधव तपास करत आहेत.