पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. मनीषा मांढरे या पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात शिक्षिका म्हणून सन २००२ पासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. गेली २४ वर्षे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांचा अध्यापनातील अनुभव लक्षात घेऊन नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) NEET परीक्षेसंदर्भातील काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीबाबत संस्था आणि मॉडर्न महाविद्यालयाचा दूरान्वये संबंध नाही. त्यांचे कार्य पूर्णतः गोपनीय स्वरूपाचे असून, संबंधित व्यक्ती आणि एनटीए यांच्यातील पत्रव्यवहार, सूचना थेट मनीषा मांढरे यांना देण्यात येत होत्या. त्यामुळे या प्रक्रियेशी महाविद्यालय प्रशासन अथवा संस्थेचा दूरान्वये संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मनीषा मांढरे यांना नीट २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमांद्वारे समोर आली. ही बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटना शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणाऱ्या आहेत. या प्रकाराची संस्था व महाविद्यालय स्तरावर गांभीर्याने दखल घेऊऩ मनीषा मांढरे यांच्या संदर्भात सोमवारी (१८ मे) संस्थेच्या नियामक मंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत मांढरे यांच्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ (एमईपीएस) कायद्यातील ३३ (५) या नियमानुसार निलंबनाची कारवाई करून त्यांना अटक झालेल्या दिनांकापासून (शनिवार, १६ मेपासून) महाविद्यालयाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मांढरे यांच्या निलंबनाबाबत शिक्षण आयुक्त, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसंचालक कळवण्यात आले आहे. या बाबत पुढील चौकशी सीबीआयच्या सहकार्याने करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
