काही माणसं असतात झाडांसारखी निर्वाज प्रेम करणारी, अकृत्रिम स्नेह देणारी सावली देणारी, आधार देणारी, सहवासाने सुगंध देणारी, अशी माणसं आपल्याजवळ सतत राहतात, आठवणींच्या रूपाने, वस्तू रूपाने तर काही झाडांच्या रूपाने. मग त्यांच्याशी सुख-दु:खाच्या गप्पाही होतात. माझ्या गच्चीवरचा मोगरा असाच माझी मैत्रीण शालिनीताई पाटील यांनी दिलेला. दहा-बारा वर्षे सहज झाली असतील तो माझ्याकडे येऊन. थोडी पानं काढून टाकली की ताजी दमदमीत फूट येऊन कळ्यांनी डवरून जातो, अन् शालिनीताई भेटल्याचा आनंद होतो. झाडांची, फुलांची बाग करण्याची त्यांना फार आवड होती. त्यांची मुलगी माझ्याएवढी पण आमचीच मैत्री जास्त होती. त्यांच्यासाठी झाड आणताना चार रोपं माझ्यासाठी सुद्धा आणायच्या. त्यांच्या मुलीने डॉ. अरुणा पाटील यांनी हा वारसा जपलाय. त्यांच्या शब्दात सांगायचे तर ‘पूर्वी मी परसबागेची परंपरागत पद्धत वापरत असे, बाहेरून माती खत आणून त्यात थोडा पाला घालून भाजीपाला, फुलझाडं लावत असे. पण तुमची निव्वळ पालापाचोळ्यावर फुललेली गच्ची पाहिली, देवराईच्या भेटी केल्या अन् ह्य़ुमस निर्मितीचे रहस्य समजले, मग घरी पाल्याची पोती यायला लागली, पाला मागण्यातला संकोच दूर झाला. थर्माकोलची खोकी, जुन्या प्लास्टिक बादल्या मागण्याचे धैर्य आले. आता त्यांच्या परसबागेत ड्रममध्ये मोसंबी, अंजीर, डाळिंबाने बाळसं धरलं आहे. तुरीच्या शेंगांनी झाड लगडले आहे. फ्लॉवर, भेंडय़ा रसरसले आहेत. जमिनीलगत रसदार स्ट्रॉबेरीज लागल्या आहेत. एकदा शिरीषाच्या फुलांच्या कचऱ्यात पावणेदोन किलो आलं लावलं तर सहा किलो आलं मिळालं. आता हा प्रवास परसबागेकडून शेतीकडे झाला आहे. जमिनीच्या छोटय़ा तुकडय़ांत पालापाचोळा जिरतो आहे. शेतातला काडी कचरा जाळणं बंद झालं आहे. काडीकचरा सजिवांचे पोषण करून जमिनीचा कस वाढवत आहे. हे सगळं सोपं नाही पण अरुणाताई जिद्दीने ही वाट चालत आहेत. परसबागेत देशी गुलाब, आर्किड्स, ऋतूनुसार फुलणारी छोटी छोटी फुलझाडं आहेत पण शेतात पक्ष्यांना आवडणारी, आसरा देणारी, अन्न देणारी, औषधी, जमिनी सुधरवणारी अशी काटेसावर, पळस, पांगरा अशी देशी झाडं लावली आहेत. या वर्षी पक्ष्यांनी बाजरी खाल्ली, किडे फस्त केले. विष्ठारूपी खत दिले अन् आम्हालाही निर्विष, सकस बाजरी दिली, असे त्यांनी सांगितले.

शहरीकरण आपण थांबवू शकत नाही. बोरीबाभळीच्या जागी बॉटलपाम लागत आहेत तेही आपण थांबवू शकत नाही पण आमच्या खडकाळ तुकडय़ाचे आम्ही सजीव मातीने ओअ‍ॅसिस करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ही वाटचाल कौतुकास्पद आहे.

औंध येथे राहणाऱ्या रत्नाताई गोखले यांची माझी अशीच हरित मैत्री. बंगलोरहून इथे स्थायिक झाल्यावर बागेचा छंद वाढवला अन् कंपोस्टचा लळा लागला. त्याचा अभ्यास अन् प्रयोग सुरू झाले. कंपोस्ट करताना ओला हिरवा कचरा व वाळलेला ब्राऊन कचरा याचे प्रमाण महत्त्वाचे असते हे त्यांच्या लक्षात आले. कार्बन नायट्रोजन (उ:ठ) रेशोचे महत्त्व कळले. परवा त्यांचा फोन आला. ‘अग चार महिने अमेरिकेला गेले होते पण जाताना तुझ्याकडे आहे, तसे ऑटोमेटेड ठिबक सिंचन करून गेले होते. आज आल्या आल्या पहाटे पहिल्यांदा बागेत गेले तर पडदीवर मोठ्ठा भोपळा लटकला होता. इतका आनंद झाला, लगेच तुला फोन केला. रत्नाताईंकडे भाजीपाला आहेच पण छोटय़ा कुंडय़ांत फुलझाडं आहेत. या कुंडय़ांत त्यांनी छान प्रयोग केला आहे. प्रत्येक कुंडीत छोटी प्लास्टिक बाटली भोकं पाडून ठेवली आहे. त्यात भाजीपाल्याची डेखं, फळांच्या साली घालतात व रद्दी पेपर, कार्डबोर्ड खोक्याचे तुकडे घालतात. (उ:ठ) रेशो प्रमाणात राहतो या सगळ्यांचे विघटन होताना त्यातील ह्य़ुमिक अ‍ॅसिडचा झाडांना फायदा होतो असे त्यांच्या लक्षात आले आहे. या बाटल्या म्हणजे झाडांना ताजे अन्नपुरवठा करणारे डबेच आहेत. त्यामुळे झाड खूश आहेत अन् मेडिकलच्या दुकानातील बाटल्यांचा पुनर्वापर झाला हा बोनस. रत्नाताई गणितज्ञ अन जिज्ञासू, परसबाग ही त्यांच्यासाठी प्रयोगशाळा आहे. गांडुळे कॉटनच्या चिंध्या फस्त करतात, पण कृत्रिम धाग्याचे कापड खात नाहीत हा त्यांचा अनुभव. पण या चिंध्या ओलावा धरून ठेवतात म्हणून गांडुळवस्ती छान वाढते. बागेत प्रयोग करून इतरांबरोबर त्याची देवाण घेवाण करणे रत्नाताईंना आवडते, त्यातूनच आमची मैत्री बहरली.

नवीन घरात गेल्यावर गच्चीवर बाग करायची हे नंदाताई इंगवल्यांनी ठरवलं होतं. बाग करायची म्हणजे प्रथम माती आणायची ही धारणा असते पण ‘लोकसत्ता’मधील संपदाताई वागळे यांनी माझ्या गच्चीवर मातिविना बाग केल्याबद्दलचा लेख वाचला अन् त्या व त्यांची आर्किटेक्ट मुलगी क्षितिजा इंगवले दोघी माझ्याकडे धडकल्या. आल्या त्या मोठ्ठा प्लास्टिक ड्रम घेऊनच. क्षितिजाने स्वत: ड्रमला भोकं पाडली. सुनीलने तिला पालापाचोळा, ओला कचरा व कोकोपीथचे थर देऊन ड्रम कसा भरायचा दाखवले. नंदाताईंनी लगेच आजूबाजूच्या बंगल्यातून, भाजीवाल्याकडून झाडांसाठी खाऊ गोळा केला अन् गच्चीभर ड्रम ठेवले. त्यात लिंबू, हातगा, आंबा, केळी, प्राजक्त लावले आहेत. गच्चीच्या जिन्यावर तोंडली, भोपळा, घेवडा अशा वेलवर्गीय भाज्या लावल्या आहेत. शेतीची पाश्र्वभूमी असलेलं हे कुटुंब गच्चीवर आता सजीव मातीवर शेती करत आहे. आर्किटेक्ट असलेली विशीतली क्षितिजा हिने पालापाचोळा वापरून सजीव माती करायचे तंत्र आत्मसात केले आहे. व्यवसायाच्या माध्यमातून ती अनेकांच्या घरात या मातीचा हिरवा कोपरा फुलवून देईल, अशी माझी खात्री आहे.

परसबागेच्या माध्यमातून अनेक जण आनंद मिळवत आहेत. ही बाग अन् हा आनंद निसर्गस्नेही असावा, असा अनेक जण प्रयत्न करत आहेत. हे चित्र निश्चितच सुखावह आहे.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)