खासदारांनी गावे दत्तक घेऊन त्यांच्या फंडातून गावे उभी राहत नसतात. पैशाने केवळ इमारती, रस्ते होतील, पण गावातील माणसे उभी केली पाहिजेत. त्यासाठी गावात शुद्ध आचार-विचाराचे व चारित्र्यशील नेतृत्व उभे केले पाहिजे, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
वनराई व वनराई फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ शनिवारी अण्णा हजारे यांना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी आदी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, खेडय़ांचा विकास हा गांधीजींचा धागा मोहन धारिया यांनी पकडला होता. वनराईचा त्यात महत्त्वाचा सहभाग होता. आज आपण निसर्गाचे व मानवतेचे शोषण करून विकासाचे स्वप्न पाहतो आहोत. मात्र, गावे उभी राहिल्याशिवाय देश उभा राहणार नाही. सामाजिक व राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचे काम धारिया यांनी हाती घेतले होते. धारियांचा विचार घेऊन अजून खूप पुढे जावे लागेल. आपल्या प्रपंचाबरोबरच समाजाच्या प्रपंचासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तसे केले नाही तर देश घडणार नाही. उंच इमारती बांधणे म्हणजे आदर्श गाव नव्हे, ज्यांच्यासाठी या इमारती आहेत, ती माणसे उभी राहिली पाहिजेत.