पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हैदर शेखने पुणे, राज्यातील विविध शहरात, तसेच दिल्लीत मेफेड्रोन विक्रीस पाठविल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. मेफेड्रोन विक्रीतून आलेले पैसे हैदरने हवालामार्फत दिल्लीत पाठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालायत दिली.

हेही वाचा >>> सरकारने सोडले तब्बल १६६ कोटींवर पाणी

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. भैरवननगर, विश्रांतवाडी), आयुब अकबर मकानदार (रा. सांगली), संदीप राजपाल कुमार (वय ३९), दिवेश चरणजीत भूतानी (वय ३८), संदीप हनुमानसिंग यादव (वय-३२), देवेंद्र रामफूल यादव (वय ३२, रा. दिल्ली) या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी तपासाबाबत न्यायालयात माहिती दिली.

पुणे पोलिसांनी आंतराष्ट्रीय पातळीवरील अमली पदार्थ तस्करी प्रकरण उघडकीस आणले. आतापर्यंत पाेलीसांनी एकूण तीन हजार ६७५ काेटी १३ लाख ६० हजार रुपयांचे एक हजार ८३७ किलाे ५६८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. आरोपींनी माेठया प्रमाणात मेफेड्रोन उत्पादन, साठा, वितरण केले आहे. पुण्यातील प्रमुख अमली पदार्थ तस्कर हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले पैसे दिल्लीतील वीरेन सिंग, संदिप धुनिया यांना पाठविल्याचा संशय असून त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक सय्यद यांनी न्यायालयात सांगितले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू होताच नागरिकांच्या घोषणा, “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर झालाच पाहिजे”

आराेपींनी अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली का?, मेफेड्रोन तयार करण्यासाठी त्यांना कोणी मदत केली, तसेच त्यांनी रासायनिक पदार्थ कोठून आणले, यादृष्टीने तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ॲड. नीलीमा यादव-इथापे यांनी युक्तीवादात केली. बचाव पक्षाचे वकील ॲड. मते, ॲड. एम. बी. जगताप, ॲड. एस. डी. गदादे यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने आरोपी वैभव माने, अजय करोसिया, हैदर शेख यांना चार मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी मकानदार, संदीप कुमार, संदीप यादव, दिवेश भूतानी, देवेंद्र यादव यांना सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.