पुणे : मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी दोन ते तीन टक्के रुग्णांच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन मेंदुविकाराची लक्षणे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. लंडनमधील संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले.

लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातर्फे मंकीपॉक्स संसर्गाबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये त्वचेवरील पुरळ, ताप आणि विषाणूजन्य लक्षणांचा समावेश आहे. त्याबरोबरीने संसर्ग असलेल्या दोन ते तीन टक्के रुग्णांच्या मेंदूच्या कार्यात अडथळा दिसून आल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.

मंकीपॉक्सशी साधर्म्य असलेल्या देवी या आजारातही मेंदूच्या कार्यात अडथळा हे लक्षण नोंदवण्यात आले आहे. यज्ञ पार्श्वभूमीवर संशोधन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. शोधनातील निष्कर्ष ‘ई-क्लिनिकल मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात नोंदवण्यात आले आहेत.  

मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या दोन ते तीन टक्के रुग्णांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यामध्ये मेंदुविकाराची लक्षणे दिसली. यामध्ये प्रामुख्याने मेंदूवरील नियंत्रण सुटणे तसेच दीर्घकालीन दुष्परिणाम करू शकेल, अशी सूज दिसून आली. काही रुग्णांमध्ये संभ्रमासारख्या विकारांची नोंदही करण्यात आली. डोके दुखणे, स्नायूंमध्ये वेदना आणि थकवा ही सर्वसाधारण लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये आढळली.  मात्र ही लक्षणे किती काळ राहिली, किती रुग्णांनी भीती, चिंता, नैराश्यासारखी परिस्थिती अनुभवली याबाबत स्पष्टता नसल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

५०० रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास..

मंकीपॉक्स आणि त्याचे मानवी मेंदू आणि मनावर होणारे परिणामांचा अभ्यास करण्यासाठी भविष्यात आणखी सखोल संशोधनाची गरज शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात येते. संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी देणारे संशोधन ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात १६ देशांमधील ५०० रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करण्यात आला आहे.