पुणे : मागील आठवडाभरापासून मोसमी पावसाची आगेकूच रखडली होती. पावसाचा जोरही कमी झाला होता. मात्र, आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यात सहा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पावसाने दहा जूनपर्यंत राज्यात वेगाने प्रगती केली. दहा जून रोजी मोसमी पाऊस जळगाव, अकोला, चंद्रपुरात दाखल झाला. पण, त्यानंतर बुधवारपर्यंत (१९ जून) मोसमी पाऊस तिथेच रेंगाळला आहे.

हेही वाचा…कौतुकास्पद! पिंपरी- चिंचवडमध्ये भरतीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांनी केली राहण्याची सोय

आता मोसमी पावसाची अरबी समुद्रावरील शाखा जोर धरत आहे. अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे वेगाने किनारपट्टीकडे येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस संपूर्ण किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा…मोजक्याच दुष्काळी भागांना ‘संजीवनी’, ‘पोकरा’ प्रकल्पांतर्गत साडेचार हजार कोटींपैकी ६० टक्के रक्कम तीन जिल्ह्यांतच खर्च

मुंबईसह किनारपट्टीला पिवळा इशारा

हवामान विभागाने सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीला पुढील चार दिवस पिवळा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात प्रामुख्याने पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे. दरम्यान, किनारपट्टीवर बुधवारी (१९ जून) पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभरात अलिबागमध्ये ३८, डहाणूत ५८, हर्णेत ११, सांताक्रुजमध्ये ६ आणि रत्नागिरीत १४ मिमी पाऊस पडला आहे.