पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कंबर कसली असून, राज्याचे सहसंचालक (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार) डॉ . संदीप सांगळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला मान्सूनपूर्व पूर्वतयारीचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गुरुवारी त्यांनी विविध जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला . पावसाळ्यात उद्भवणारे कीटकजन्य व जलजन्य आजार रोखण्यासाठी तालुका आणि गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. कामावर दिरंगाई केल्यास मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी बैठकीत देण्यात आले. तसेच, आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णवाहिका व शासकीय वाहने तातडीने सुस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्गम व डोंगराळ भागातील वाहनांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

जोखीमग्रस्त गावांवर विशेष नजर

गेल्या तीन वर्षांत ज्या गावांमध्ये साथरोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला होता, अशा गावांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या जिल्ह्यातील गावांचा समावेश करण्यात येत असून नद्यांकाठची गावे, पूरग्रस्त क्षेत्र आणि पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार विशेष कार्ययोजना राबवली जाणार आहे. या गावांमध्ये नियमित सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने तपासले जातील. त्यानुसार अहवाल तयार करून तो राज्य आरोग्य विभागाला सादर करणे बंधनकारक असणार आहे.

आश्रमशाळा आणि वसतिगृहांची तपासणी

मान्सन पूर्व बैठकीत विद्यार्थी आणि वृद्धांच्या आरोग्य विषयी स्वतंत्र चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थी आणि वृद्धांच्या सुरक्षेसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे आणि वृद्धाश्रमांना पावसाळ्यापूर्वी किमान दोनदा भेटी देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, अन्नाची स्वच्छता आणि साठवणूक पद्धतीची कसून तपासणी केली जाणार आहे.

कीटक नियंत्रण आणि औषध साठा

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी माशांचा वापर, धूर फवारणी आणि अबेट फवारणी यांसारख्या उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्वत्र आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला असून, संपर्काबाहेर जाणाऱ्या दुर्गम भागांत किमान तीन महिने पुरेल इतका औषध साठा आगाऊ पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२४ तास नियंत्रण कक्ष आणि शीघ्र प्रतिसाद पथक

साथरोगाच्या कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर २४x७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेले ‘शीघ्र प्रतिसाद पथक’ सज्ज ठेवण्यात आले असून, कुठल्याही आजाराचा उद्रेक झाल्यास २४ तासांच्या आत हे पथक घटनास्थळी दाखल होऊन उपाययोजना करेल.