Premium

मोसमी वारे केरळात; १३ जूनपर्यंत कोकणात

कर्नाटकात आणि मंगळवार, १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Monsoon forecast for 2023,
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

पुणे : मोठय़ा प्रतीक्षेनंतर नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये गुरुवारी दाखल झाले. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील ४८ तासांत कर्नाटकात आणि मंगळवार, १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: १ जून रोजी मोसमी वारे केरळमार्गे भारताच्या मुख्य भूमीमध्ये दाखल होतात. यंदा ४ जूनपर्यंत पाऊस येईल, असा अंदाज होता. त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबाने आलेल्या मोसमी पावसाने केरळचा ७५ टक्के आणि तमिळनाडूचा ३५ टक्के भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. ‘स्काय मेट’ या खासगी हवामान संस्थेने ७ जूनपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. वाऱ्याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील ४८ तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात ११ जून आणि १३ जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

राज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता

राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्याआधी पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यभरात पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. गुरुवारी वर्धा येथे सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पूर्वमोसमी पाऊस झाल्यास उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 06:54 IST
Next Story
पिंपरी- चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराकडून चार पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त