पुणे : राज्यात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात मंगळवारपर्यंतच्या ( १८ जून) आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा तीन मिमी जास्त पाऊस झाला आहे. राज्यात या काळात सरासरी १०२.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडला आहे. कोकणात सरासरीपेक्षा २५ टक्के आणि विदर्भात ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३१ टक्के आणि मराठवाड्यात ६३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवार (१८ जून) अखेर कोकण विभागात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ३२७.३ मिमी पाऊस पडतो, यंदा २४६.५ मिमी पाऊस झाला आहे. किनारपट्टीवर मुंबई शहर ४६, मुंबई उपनगरे ४९, पालघर ३०, रायगड ३३, रत्नागिरी ३०, सिंधुदुर्ग १६ आणि ठाणे येथे सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा…पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या, राज्यात अवघा ५.६९ टक्के पेरण्या

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरासरी ८२.७ मिमी पाऊस पडतो, यंदा १०८.५ मिमी पाऊस पडला आहे. धुळ्यात सरासरीपेक्षा ३ टक्के, नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा ८५ टक्के आणि कोल्हापुरात सरासरीपेक्षा ४२ टक्के कमी पाऊस पडला आहे. उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. नगर ५४, जळगाव ७५, नाशिक ३, पुणे ३२, सांगली ५९, सातारा १२, सोलापूर १६९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात ६३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ७५ मिमी पाऊस पडतो, यंदा १२२ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोलीत सरासरीपेक्षा ८४ टक्के आणि नांदेडमध्ये सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. बीड ८३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ३६, धाराशिव १७०, जालना ७१, लातूर १६३ आणि परभणीत सरासरीपेक्षा ७९ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ७९.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५५.७ मिमी पाऊस पडला आहे. अकोल्यात १० टक्के, बुलढाण्यात ५३ टक्के आणि वाशिममध्ये ४२ टक्के इतका सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अमरावती २२, भंडारा ८०, चंद्रपूर ५८, गडचिरोली ६५, गोंदिया ७९, नागपूर ४२, वर्धा ३३, वाशिम ४२ आणि यवतमाळमध्ये १९ टक्के इतका सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा…पुणे : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या शाखेला? तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…

विभागनिहाय पाऊस

कोकण – सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस
मध्य महाराष्ट्र – सरासरीपेक्षा ३१ टक्के जास्त पाऊस

मराठवाडा – सरासरीपेक्षा ६३ टक्के जास्त पाऊस
विदर्भ – सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस