लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही तासांत मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. रविवारपासून (२६ मे) मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केली नाही. पण, असे असले तरीही चिंतेचे कारण नाही, मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होईल आणि त्या पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल, असे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी एक्स समाजमाध्यमावर दिलेल्या संदेशात मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला आहे. त्यामुळे उत्तर भारताला जून महिन्यात उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या या संदेशानंतर मोसमी वाऱ्याच्या प्रगतीविषयी हवामान तज्ज्ञांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा-पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, ‘रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील बाष्प बांगलादेश आणि पश्चिम बंगलाच्या दिशेने फेकले गेले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्याची बंगाल शाखेची आगेकूच काहीशी मंदावली आहे. मस्करीन बेटांवरून येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा वेगही काहीसा कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून मोसमी वाऱ्याची आगेकूच मंदावली आहे. तरीही मोसमी वारे केरळमध्ये वेळेत दाखल होतील आणि पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल.’

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, ‘मस्करीन हाय म्हणजेच आफ्रिकेतील मस्करीन बेटांवरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे. पण, ही एक हवामानविषयक प्रणाली आहे. त्यामुळे वाऱ्याचा जोर कोणत्याही क्षणी वाढू शकतो. केरळमध्ये मोसमी पाऊस वेळेत दाखल होईल.’

आणखी वाचा-Porsche Accident: “आम्ही पाहिलं ती मुलगी हवेत उडाली आणि धाडकन..”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

ओमानवर कमी दाबाचे क्षेत्र

ओमानच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा ओमानकडे ओढली जाऊन मोसमी वाऱ्याच्या प्रगतीत काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो. पण, त्या बाबतचा ठोस अंदाज व्यक्त करण्यासाठी एक- दोन दिवस वाट पाहावी लागेल, असेही माणिकराव खुळे म्हणाले.