पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे आवश्यकतेनुसार डांबरीकरण, रस्त्यांची डागडुजी, ओढे व गटारांची स्वच्छता, पदपथांची दुरुस्ती आदी कामे तातडीने हाती घ्या, असे आदेश महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळापूर्व कामांसाठी तसेच रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्थायी समितीने नऊ कोटींचा निधी मंजूर केला असून ही सर्व कामे ३० मे पर्यंत पूर्ण करावीत, असेही आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळापूर्व तयारीचा आढावा आयुक्तांनी नुकताच घेतला. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यासंबंधीची कामे सुरू करावीत, अशा सूचना या बैठकीत आयुक्तांनी दिल्या. पावसाळापूर्व तयारीच्या कामांचीही आयुक्तांनी काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी कर्वे रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, सातारा रस्ता येथे सुरू असलेली कामे पाहिली. ही कामे ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पथ व मलनिस्सारण विभागाची कामे एकत्रितरीत्या सुरू करण्यात आली आहेत. ही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या नियंत्रणात सुरू आहेत. रस्त्यांचे आवश्यकतेनुसार डांबरीकरण, खड्डे बुजवण्याची कामे, पदपथांची दुरुस्ती, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जाळ्यांची साफसफाई, गटारांमधील गाळ काढणे, नाले सफाई आदी कामेही सुरू करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जी तरतूद केली जाते त्यातून पावसाळापूर्व तयारीची कामे केली जातात. या कामांसाठी स्थायी समितीने आठ कोटी ७६ लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. डांबरीरकण व अन्य कामांवर हा निधी खर्च होईल. अंदाजपत्रकात या कामांसाठी दहा कोटींची तरतूद असून गरज पडल्यास या कामांसाठी आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी सांगितले.