scorecardresearch

महाबँकेचे कर्मचारी संपावर, दोन हजारपेक्षा जास्त शाखा बंद; रोखीचे, धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले

युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियमनच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक

Mahabank employees strike
महाबँकेच्या कर्मचाऱ्यांचा संप

नोकरभरती करण्यासह विविध मागण्यांसाठी महाबँकेच्या कर्मचारी शुक्रवारी (२७ जानेवारी) संपावर गेले आहेत. त्यामुळे या बँकेच्या देशभरातील दोन हजारपेक्षा जास्त शाखा आज बंद असून रोखीचे आणि धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियमनच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे : पीएमआरडीएकडून वाघोलीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

गेल्या दहा वर्षात बँकेचा व्यवसाय २५० टक्के पटीने वाढला आहे. ४५० नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत, तर कर्मचाऱ्यांची संख्या, मात्र २० टक्क्यांनी कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा यामुळे रिकाम्या झालेल्या जागा भरलेल्या नाहीत. याचा परिणाम म्हणून बँकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दररोज जास्त वेळ काम करावे लागत आहे. सुटीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते. आवश्यकतेनुसार सुट्या घेता येत नाहीत. यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य झाले आहे. तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येत नाही. याचा बँकेच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापन दखल घेत नाही. या पार्श्वभूमीवर संपाची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती युनियनचे निमंत्रक विराज टीकेकर आणि सहनिमंत्रक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा- पुणे ग्रामीण भागातील सीएनजी पंप बेमुदत बंद; वाहनधारकांना मनस्ताप

दरम्यान, शेवटचा मार्ग म्हणून मुंबईचे उपमुख्य कामगार आयुक्त यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आयुक्तांनी समेट घडविण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कोणतीही तडजोड घडून आली नाही. या संपामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकरभरतीच्या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या शाखांसमोर, कार्यालयांसमोर निदर्शने, धरणे आंदोलन करून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना विरोध प्रदर्शित करत आहेत, असेही टीकेकर आणि कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 14:49 IST