ज्ञान प्रबोधिनीतर्फे परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मेळ
पुणे : ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत संस्कृती संशोधिका म्हणजेच संत्रिका विभागाने करोना काळामध्ये एक हजारांहून अधिक श्राद्ध संस्कार ऑनलाइन स्वरूपात केले. पारंपरिक विधीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत लोकांची गरज पूर्ण करण्यात आली.
मार्च अखेरपासून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. टाळेबंदीमुळे सारे घरामध्येच बंदिस्त झाले. व्यवहार काही काळ ठप्प झाले असले, तरी एका गोष्टीला मात्र काहीही उपाय नव्हता. या परिस्थितीत अनेक जणांना आपल्या जिवलगांचा वियोग सहन करावा लागला. आधीच जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख आणि त्याबरोबरच आता श्राद्ध संस्कार कसे करायचे हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी टाळेबंदी संपल्यावरच श्राद्ध विधी करावेत असे सांगितले. त्यासाठी किती काळ वाट पाहायची? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच होता. ज्ञान प्रबोधिनीच्या ‘संत्रिका’ म्हणजे ‘संस्कृत संस्कृती संशोधिका’ या विभागाने यासाठी पर्यायी व्यवस्था दिली आहे, अशी माहिती या विभागाच्या डॉ. मनीषा शेटे यांनी दिली. शेटे म्हणाल्या, गेल्या सहा महिन्यांपासून श्राद्ध संस्कार कार्यासाठी तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा मेळ घालत ऑनलाइन संस्कार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सुरुवातीला काहीसे सावध पण नंतर अगदी बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात पुरोहितांनी संस्कारसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.
एप्रिलपासून अखंडपणे सुरू असलेल्या ऑनलाइन संस्कार कार्यातून एक हजारांहून अधिक संस्कार झाले आहेत. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पुरोहितांनी फक्त पुण्यातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, दुबई ,मलेशिया येथेही ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने संस्कार केले.
शुभ कार्येही ऑनलाइन
काही पुरोहितांनी वास्तुशांती, साठीशांती, सत्यनारायण, मंगळागौर, गणेश प्रतिष्ठापना असेही संस्कार, शांतिकर्म आणि पूजा अशी शुभ कार्येही ऑनलाइन पद्धतीने केली. तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे एक उपनयन संस्कार झाला. तर मुंबई, छत्तीसगड आणि ऑस्ट्रेलिया येथे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन विवाह संस्कार ऑनलाइन पद्धतीने झाले. ज्यामध्ये वधू-वर, मोजकेच कुटुंबीय प्रत्यक्षात आणि बाकी वऱ्हाडी मंडळी शुभेच्छा देण्यासाठी ऑनलाइन सहभागी झाली होती, असे डॉ. मनीषा शेटे यांनी सांगितले. अनेकदा आजूबाजूची परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते. अशा वेळी थोडासा चाकोरीबाहेरचा विचार करून परिवर्तनाचा आधार घेत आपण मार्ग काढू शकतो. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून संस्कारविषयक हे काम समाजाची गरज लक्षात घेऊन करण्यात येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
