पहिल्या टप्प्यातील ७९२ सदनिकांच्या गृहयोजनेचे काम सुरू

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून येत्या तीन वर्षांत विविध पेठांमध्ये सात हजारापेक्षा जास्त घरांची निर्मिती केली जाणार आहे. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यामध्ये वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सध्या ७९२ सदनिकांच्या गृहयोजनेचे काम सुरू आहे. तर उर्वरित गृहप्रकल्प उभारणीसाठी प्राधिकरणाकडून हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाचे काम ठप्प होते. मोशी येथील पेठ क्रमांक १२ मध्ये गृहयोजना राबविण्यासाठी एका खाजगी ठेकेदाराला काम दिले होते. मात्र, त्याबाबत वाद निर्माण झाल्याने हा विषय न्यायालयात गेल्याने प्रकल्प रखडला होता. अनेक वर्षांपासून गाजत असलेला पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्प पूर्ण करण्याचे काम आता प्राधिकरणाने हाती घेतले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असून सल्लागार नेमल्यानंतर तेथील गृहप्रकल्पाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. पेठ क्रमांक १२ मध्ये अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट तसेच उच्च उत्पन्न गटासाठी एकून चार हजार सदनिका बांधण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात प्राधिकरणाचा सर्वात मोठा गृहप्रकल्प पेठ क्रमांक १२ मध्ये साकारणार आहे. या गृहप्रकल्पामध्ये रहिवाशांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच शाळेसाठीच्या भूखंडाचे आरक्षणही ठेवण्यात आले आहे.

पेठ क्रमांक १२ प्रमाणेच पेठ क्रमांक सहामध्ये सहाशे सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मोशी येथील पेठ क्रमांक सहामध्ये चार एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा गृहप्रकल्प उभा करण्यात येणार आहे. यासाठी आर्किटेक्चरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या पेठ क्रमांक ३० आणि ३२ वाल्हेकरवाडी येथील ७९२ सदनिकांच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, प्रशासनाने ठेकेदाराला दंडाची नोटीस दिल्यानंतर काम सुरू झाले आहे. प्राधिकरणाचे संपूर्ण गृहप्रकल्प कोरियन तंत्रज्ञानावर आधरित असून बांधकामाचे बहुतांश साहित्य कोरियामधून आयात केले आहे. त्यामुळे बांधकामाचा मजबूतपणा चांगल्या दर्जाचा आहे. सदनिकांचे वितरण सोडत पद्धतीने  करण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गचे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या सदनिका लाभार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा फायद्याच्या होणार आहेत.

सदनिकांचे काम येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता असली, तरी काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्ष लागणार आहेत. या तीन पेठांशिवाय आणखी इतर पेठांमध्ये गृहप्रकल्प राबविता येतो का याची चाचपणी प्राधिकरण प्रशासनाकडून सुरू आहे.