पिंपरी : अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत पुरातत्त्व विभागाने अष्टविनायकातील सर्व मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. काम वेगाने पूर्ण होण्यासाठी अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर, श्री क्षेत्र सिद्धटेक येथील गणेश मंदिरे १० मे ते ९ जून २०२६ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुरातत्त्व विभागामार्फत अष्टविनायकातील सर्व मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मागील दोन महिन्यांपासून श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव, श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथे जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. याच अनुषंगाने मंदिर परिसरात विविध कामे होत असताना, मंदिराचा गणेश मूर्ती असलेला मुख्य गाभारा व त्यापुढील सभामंडप याला पौराणिक काळाप्रमाणेच मूळ सुबक दगडी बांधकाम करुन त्याचे जतन व संवर्धनाचे काम करायचे आहे. हे काम करत असताना गणेश भक्तांचा सतत वावर व त्यांची उपस्थिती याचा कमाला अडथळा निर्माण होईल.
यासाठी पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी मंदिराच्या कामासाठी मंदिरे एकाचवेळी बंद करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना पत्र दिले होते. पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग, ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत चालू असेलेले हे अष्टविनायक मंदिर जतन संवर्धन आणि देखभाल दुरुस्ती काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी श्री क्षेत्र मोरगांव, श्री क्षेत्र थेऊर, श्री क्षेत्र सिध्दटेक येथील गणेश मंदिरे १० मे ते ९ जून २०२६ पर्यंत पूर्णपणे सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.
नित्य पूजा सुरू राहणार
नित्य पूजा सुरू राहणार – मंदिरे दर्शनासाठी बंद असले तरी श्रींची यांची नित्य पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहतील.
थेट दर्शन बंद – या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
प्रवेशावर निर्बंध – मंदीरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर व श्री क्षेत्र सिद्धटेक येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी तिन्ही मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी केले आहे
