पिंपरी-चिंचवडमधील मोशीमध्ये एका कचरा डेपोत बुधवारी मोठी दुर्घटना घडली. एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळून ढिगाऱ्याखाली जवळपास १५ ते २० कामगार अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, एनडीआरएफचे जवान, आर्मीचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. आता घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भेट देत घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच बचावकार्य सकाळपर्यंत सुरू राहणार असून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी काय माहिती दिली?

“आता अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली अडकलेल्या लोकांशी संपर्क केला असून तीन जणांशी संपर्क झाला. जवानांनी त्यांना हाताने चहा-बिस्किट देखील दिले आहेत, ते देखील खालून बोलत आहेत. त्यांच्या पायांवर इमारतीचा मलबा पडलेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की आमचे पाय त्यामध्ये अडकलेले आहेत. आता इमारतीचा जो मलबा पडलेला आहे, तो काढण्याचं काम सुरू आहे”, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली आहे.

“अजून १२ जण आहेत, यातील ३ जणांना संपर्क होत आहे. आणखी काही जण खालून बोलत आहेत. पण अद्याप आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीत, म्हणजे ते आपल्याला दिसलेले नाहीत. पण युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बचावकार्य करताना अडचणी येत आहेत. तरीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. महापालिकेचे सर्व अधिकारी, आयुक्त, सीपी, आमदार, महापौर असे सगळेजण येथे आहेत. बचावकार्य करत असताना थोडी काळजी घ्यावी लागत आहे. कारण जर जेसीबीचा जास्त धक्का लागला आणि इमारत पुन्हा आणखी खाली कोसळली तर, त्यामुळे आपल्याला एक-एक जीव महत्वाचा आहे. हे बचावकार्य सकाळपर्यंत चालेल. पण सर्वजण सुखरुप बाहेर येतील”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी सांगितली आहे.

मनपा आयुक्तांनी काय सांगितलं?

“आता ६ लोकांना सुखरूप बाहेर काढलं. त्यातील काही लोक स्वत:चालत बाहेर आलेत. त्या ६ जणांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. हे ६ जण एकदम व्यवस्थित आहेत. तसेच बाकीच्या अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरू आहे. आतमध्ये एकूण २० जण अडकल्याचा अंदाज आहे. त्यातील सुरुवातीला ४ जणांना बाहेर काढण्यात आलं होतं, त्यानंतर ६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आता आतमध्ये आणखी १० जण असण्याची शक्यता आहे”, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडून घटनेचा आढावा

मोशीमधील कचरा डेपोत बुधवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून रोहित पवारांचा सरकारवर संताप

“पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी या ठिकाणी घातलेला कचऱ्याचा डोंगर महापालिकेच्याच कचरा प्रकल्पासाठी वापरात असलेल्या इमारतीवर कोसळल्याने इमारतीखाली तब्बल ९ पेक्षा अधिक कामगार अडकले आहेत. आज दुपारी १ वाजता ही घटना घडली, तरी अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. ही घटना अत्यंत भीषण असून प्रथमदर्शनी याला सर्वस्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जबाबदार असल्याचं दिसतं. हे सरकार कामगारांच्या जीवाला काय कचरा समजत आहे का? सध्या वेगाने बचाव कार्य राबवून अडकलेल्या कामगारांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यावं आणि या घटनेची सखोल चौकशी करुन याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.