पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सात नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली रविवारी मध्यरात्री एक वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊ इतकी झाली. या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचा पर्यावरण विभाग, ठेकेदार कंपनीला नोटीस देण्यात येणार आहे.
मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून आठ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. घटना घडल्यानंतर पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी नऊ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. तब्बल ८४ तास चाललेल्या या बचावमोहीमेतील शोधकार्यामध्ये चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या सात आणि इमारतीशेजारील ढिगाऱ्यात अडकलेल्या एक अशा आठ व्यक्तींचा मृत्यू झाला.
शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविले
इमारतीत अडकलेल्या भावेश वाणी यांचा नऊ जुलै रोजी मृत्यू झाला होता. बचावकार्याच्या चौथ्या दिवशी अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय ३४, मोशी) यांचा मृत्यू झाला. एक नागरिक इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकून पडल्याने त्याठिकाणी शोधमोहीम सुरू होती. अखेर रविवारी मध्यरात्री एक वाजता वामन कसबे (वय ५०, मोशी) यांचा मृतदेह हाती लागला. या दुर्घटनेत अडकलेल्या सर्व नागरिकांचे शोधकार्य पूर्ण झाल्याने तब्बल ८४ तास चाललेली ही बचावमोहीम रविवारी मध्यरात्री दोन वाजता थांबविण्यात आली.
पर्यावरण विभाग, ठेकेदार कंपनीला नोटीस
मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच या घटनेच्या सखोल चौकशीचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
मदतीसंदर्भात तातडीने कारवाई
कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ व्यक्तींच्या नातेवाईकांना महापालिकेकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत दिली जाणार आहे. ही मदत देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जीव गमावलेल्या या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. हा अत्यंत वेदनादायी प्रसंग असून दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे महापौर रवी लांडगे यांनी म्हटले आहे. ही घटना दुर्दैवी असून यामध्ये नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मनाला प्रचंड वेदना देणारी ही घटना आहे. यंत्रणांनी तब्बल ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. नऊ नागरिकांना सुखरुप बाहेर देखील काढले. मात्र नऊ नागरिकांचा झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.
