पिंपरी : अवघ्या दीड वर्षापूर्वीच झालेले लग्न…आई-वडीलांना सांभाळत भविष्यातील स्वप्ने बघत चाललेला सुखी संसार…मात्र, या स्वप्नांना नियतीची नजर लागली अन् क्षणार्थात या स्वप्नांची राखरांगोळी झाली. मोशी येथे कचऱ्याचा डोंगर काळ बनून आला आणि होत्याचे नव्हते केले. त्याच्या अचानक जाण्याने आई आणि पत्नीला मानसिक धक्का बसला असून आईला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा’च्या तीन मजली इमारतीवर पडल्याने इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी (वय ३३, रा. रूपीनगर, तळवडे, मूळगाव – जळगाव) यांचा मृत्यू झाला. भावेश हे मोहन वाणी यांचे एकुलते एक पुत्र होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या बहीणीचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबासाठी तेच एकमेव आधार होते.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत वडिलांनी घरोघरी जाऊन पापड आणि पाव विकून भावेशला लहानाचा मोठा केला होता. शिक्षणात हुशार असलेल्या भावेशने शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहा वर्षापूर्वी नोकरीनिमित्त पुण्याची वाट धरली. सुरूवातीला ते पुण्यात कामाला होते. खडकीत राहत होते.

सात वर्षापूर्वी ते ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ या कंपनीत वरिष्ठ कार्यकारी लेखापाल म्हणून कामाला लागले. कंपनीचे कार्यालय कासारवाडी येथेही असल्याने भावेश चार दिवस कासारवाडी येथील कार्यालयात काम करीत असत, तर दोन दिवस मोशीतील कार्यालयात असत. दीड वषापूर्वी भावेश यांचे लग्न झाले. लग्नानंतर ते रूपीनगर येथे स्थायिक झाले. आई-वडीलही त्यांच्यासोबत राहत होते. गेले तीन दिवस भावेश हे कासारवाडीतील कार्यालयात होते.

बुधवारी त्यांंची नेमणूक मोशीतील कार्यालयात होती. सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर आले. दुपारी दीडच्या सुमारास जेवणासाठी सुटी झाली. सर्व जण पहिल्या मजल्यावरील उपहारगृहामध्ये गेले. मात्र, जेवण करीत असतानाच कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने इमारत कोसळली आणि सिमेंटचा पिलर डोक्यावर पडून भावेश त्याखाली गाडले गेले आणि एका उमलत्या संसाराचा करूण अंत झाला. हसत-खेळत असलेल्या कुटुंबाचा एकमेव आधार कायमचा हिरावला गेला आहे. एकुलता एक असणाऱ्या भावेशच्या मृत्यूने त्यांची आई शालिनी, पत्नी मोहिनी यांना मानसिक धक्का बसला आहे. आईला वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘जेवायला बसलो आहे’ संदेश शेवटचा ठरला

जेवणाची सुटी झाल्यानंतर भावेश दीड वाजता उपहारगृहामध्ये जेवणासाठी गेले. जेवण करीत असताना त्यांनी पत्नी मोहिनी हिला मोबाइलवर ‘जेवायला बसलो आहे’ असा संदेश केला. त्यानंतर काही क्षणातच इमारतीवर डोंगर कोसळला आणि भावेशने केलेला संदेश पती-पत्नीमधील शेवटचा संवाद ठरला.