पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने झालेली दुर्घटना ही नैसर्गिक आपत्तीच आहे. मात्र, इमारतीचे स्ट्रक्चर, कचरा डेपो आणि इमारतीमध्ये अंतर योग्य होते का, या सगळ्यांची बचाव कार्यसंपल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केली जाईल. यात कोणी दोषी असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी या घटनेच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात आंदोलन सुरु केले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, आठ जुलै रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून शोधकार्य राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यात बराच वेळ गेला आहे. त्रयस्थ व्यक्तींना शोधकार्य मंदावले असल्याचे वाटत आहे. परंतु, शोधकार्य मंदावले नाही. कठीण शोधकार्य आहे. कोसळलेल्या इमारतीमधील छोट्या खोलीत (पॅन्ट्री) आठ लोक अडकले आहेत. त्यासाठी कचरा बाजूला करावा लागत आहे.
आता इमारत खोलली जाणार आहे. त्यातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नातेवाईकांची भावना समजू शकतो. नातेवाईकांना धीर दिला आहे. १२ मशीनच्या माध्यमातून कचरा हटविला जात आहे. नवीन दहा मशीन आणल्या आहेत. परिस्थितीनुसार बचावकार्य राबविण्यात येत आहे. पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन्ही स्लॅप एक झाले आहे. बचावकार्य अतिशय कठिण झाले आहे. येथे कचरा असल्याने मिथेन गॅस तयार होत आहे. त्यामुळे अडचण येत आहे.
पोलीस उपायुक्त मारुती जगताप म्हणाले, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. ईडीआरनुसार तपास सुरु असून कोण दोषी आढळले, तर गुन्हा दाखल केला जाईल.
शिवसेनेचे आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, नगरसेवक नीलेश तरस आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
बचावकार्य सुरुच
महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील कचर्याचा डोंगर पडून तीन मजली इमारत कोसळल्याने कचऱ्याखाली अद्यापही आठ कामगार दबले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. २४ तासांहून अधिक काळ बचाव कार्य राबवून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर, गुरुवारी एका कामगाराचा मृतदेहही हाती लागला.
दुर्घटनेत अडकलेल्या १८ कामगारांच्या सुटकेसाठी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), महापालिकेचा अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सहा कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. गुरूवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत या तीन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास भावेश वाणी यांचा मृतदेह हाती लागला. अद्यापही आठ कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
