पिंपरी : मदतनिधीपोटी मिळणाऱ्या पैशाच्या वाटपाच्या कारणावरून वाद आणि शिवीगाळ करीत मानसिक छळ होत असल्याने मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका कामगाराच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती, दिर, जावेविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले नागेश गायकवाड (वय २६) यांची पत्नी सोनाली (वय २३) बुधवारी सायंकाळी घरी एकट्या होत्या. त्या सातच्या सुमारास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत तपासाची मागणी केली आहे. याप्रकरणी सोनाली यांच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात मानपान केला नाही. खर्च केला नाही, दोन्ही मुलीच झाल्याच्या कारणावरून सोनाली यांना वारंवार टोमणे मारले. सोनाली यांचे पती नागेश यांचा मोशी दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांना मदतनिधीपोटी मिळणाऱ्या पैशाच्या वाटपाच्या कारणावरून वाद आणि शिवीगाळ करीत मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त करून तिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपावरून सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती, दिर, जावेविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन चिमुकल्या पोरक्या

नागेश यांच्या मृत्यूनंतर सोनाली मानसिक तणावाखाली होत्या. त्या गृहिणी असून, त्यांना दोन मुली आहेत. एकीचे वय दोन वर्षे, तर दुसरी एक वर्षाची आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोमध्ये आठ जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली अनधिकृत प्रशासकीय इमारतीवर कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नागेश यांचाही समावेश होता. नागेश यांचा मृतदेह १२ जुलै रोजी सायंकाळी सापडला होता. एका महिन्याने, १२ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीनेही मृत्यूला कवटाळले.