पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोच्या परिसरातील शंभर मीटर प्रतिबंधित क्षेत्रात (बफर झोन) सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगवर ई क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणविराेधी पथकाने कारवाई केली आहे. मोशी येथे १९९१ पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कचरा डेपो आहे. या डेपोपासून प्रतिबंधित क्षेत्राचे अंतर ५०० मीटर निश्चित करण्यात आले होते.

मोशी परिसरातील खानदेशनगर, आदर्शनगर, कल्याणनगर, तापकीरनगर या भागांतील वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने सन २०१५-१६ मध्ये विशेष अधिसूचना जारी करून प्रतिबंधित क्षेत्राची हद्द कमी केली होती. शंभर मीटर हद्द निश्चित करण्यात आली. हद्द कमी झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रामधून वगळलेल्या ४०० मीटर अंतरातील मोकळ्या जागेसह कचरा डेपोच्या भिंतीपर्यंत प्लॉटिंग करून जागेची विक्री सुरू झाली होती.

कचरा डेपोलगत बांधकामे उभारली होती. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनी तक्रार केली होती. त्यानुसार ई क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिबंधित क्षेत्रामधील अनधिकृत बांधकामांना नोटीस बजाविली होती. तीन एकर परिसरातील विक्रीसाठी करण्यात आलेले जागेचे प्लॉटिंग आणि त्यासाठी उभे केलेले सुरक्षा कुंपण व खांब तोडून टाकण्यात आले. नियोजित मोशी रुग्णालयाशेजारील आठ अनधिकृत बांधकामेही पाडण्यात आली. चऱ्होली येथील महापालिका आरक्षणाच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात आले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार, पोलीस बंदोबस्तात क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांनी ही कारवाई केली. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अतिक्रमण, तसेच बांधकाम करू नये. त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल, असा इशारा क्षेत्रीय अधिकारी वाघमोडे यांनी दिला आहे.