पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत ढासळल्याच्या दुर्घटनेत कचऱ्याखाली दबलेल्या सात जणांचे मृतदेह चौथ्या दिवशी शनिवारी सापडले. इमारतीच्या बाजूला दुसरीकडे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
मोशी दुर्घटनेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नऊ कामगारांची बुधवारी सुखरूप सुटका करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी भावेश वाणी यांचा मृतदेह सापडला होता. ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ कामगारांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य राबविण्यात येत होते. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिटचा भाग फोडून शनिवारी शोधकार्य राबविण्यात आले. त्यामध्ये सात जणांचे मृतदेह सापडले. अक्षय सावंत (वय ३५, रा.मोशी) सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या मृतदेहांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
चार दिवसांच्या शोधकार्यानंतर सापडले सात मृतदेह
कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने इमारत ढासळली होती. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अडकला होता. जेवढा कचरा उचलला जात होता, तेवढा कचरा डोंगरावरून कोसळत होता. कचऱ्याचा ढिगारा उपसताना यंत्रणांची दमछाक झाली होती. जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या माध्यमातून कचरा हटविण्यात आला. तीन दिवसांच्या शोध कार्यानंतरही कोणाचाही शोध लागत नसल्याने शनिवारी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिटचा भाग फोडण्यात आला. त्यामुळे जवानांना आतमध्ये शिरण्यासाठी मार्ग मिळाला. त्यानंतर दुपारपासून मृतदेह सापडण्यास सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजता एक मृतदेह सापडला. आठ वाजेपर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले.
शोधकार्य सुरूच
इमारतीच्या बाजूला असलेल्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या वामन कसबे यांचा शोध सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. कसबे हे कचरा डेपोतील रस्त्यावरून खाली उतरत होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर कचऱ्याचा ढीग पडले आहेत. त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
