पिंपरी : ‘माझे बाबा सापडले का हो? कुणीतरी सांगा ना, माझे बाबा आत सुरक्षित आहेत ना’? मोशी कचरा डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरून आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येक सरकारी वाहनाकडे धाव घेत २५ वर्षीय सारिका विचारत असलेला हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवत आहे. मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाची इमारत कोसळून २४ तास उलटले, तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या एका हताश मुलीची ही आर्त हाक ऐकून पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले.

तापकीरनगर, मोशी येथील रहिवासी असलेले वामन कसबे हे या कचरा डेपोत अँटोनी लारा रिन्युएबल या कंपनीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (८ जुलै) सकाळी नेहमीप्रमाणे ते घरून कामावर निघाले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांनी डबा खाल्ला. जेवणाची सुटी संपायला अवघी पाच मिनिटे बाकी होती, म्हणून ते पहिल्या मजल्यावरील उपाहारगृहामध्येच थोडे रेंगाळले; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याच पाच मिनिटांत इमारतीच्या पाठीमागील कचऱ्याचा भलामोठा डोंगर खचला आणि संपूर्ण तीन मजली इमारत ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

दुर्घटनेची माहिती पसरताच कसबे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक कचरा डेपोच्या गेटवर पोहोचले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कोणालाही आत सोडण्यास नकार दिला. सुरुवातीला प्रशासनाकडून वामन कसबे आत अडकल्याची पुष्टी दिली जात नव्हती. नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर संतप्त नातेवाईकांनी कंपनीचे ‘हजेरी पुस्तक’ शोधून काढले आणि कसबे बुधवारी कामावर हजर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा प्रशासनाने वामन कसबे हे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये असल्याची अधिकृत पुष्टी केली.

प्रवेशद्वारावर नातेवाईकांचा आक्रोश

सध्या घटनास्थळी भारतीय संरक्षण विभाग, एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके कचऱ्याचा ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. २४ तास उलटून गेल्यानंतरही वामन कसबे यांच्यासह आठ नागरिक अजूनही आत अडकलेले आहेत. कचरा डेपोच्या गेटवर नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती आणि चिंता वाढत आहे. आतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेकडे आणि शासकीय मोटारीकडे सारिका ज्या आशेने धावत जात आहे, ते पाहून प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावत आहेत.