पिंपरी : मोशीतील कचरा डेपोत साठलेल्या कचऱ्याच्या डोंगराचे स्खलन होऊन त्याने बुधवारी दुपारी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीलाच पोटात घेतले. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील १८ कामगार कचऱ्याखाली अडकले. त्यातील सहा जणांना बुधवारी सायंकाळपर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले. तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आले. रात्रभर बचावकार्य राबविण्यात आले आहे. उरलेल्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शोध कार्य राबविण्यात येणार आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्कराला पाचारण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन हेही घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घटना घडल्यानंतर अग्निशामक विभाग, एनडीआरएफ, पोलिसांच्या मदतीने तातडीने बचावकार्य राबविण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंत एका महिलेसह सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सोमनाथ शेळके (वय ४०), सचिन रामदास दबडगाव (वय ३२), दादासाहेब किसन आडे (वय ४६), सुजाता शिंदे (वय ४९), रामप्रतापसिंह चौहान (वय ३६), रणवीरसिंग (वय ६०) या सहा जणांची बुधवारी सायंकाळी सुखरूप सुटका करण्यात आली. विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांना मध्यरात्री बाहेर काढण्यात यश आले. महेश कुंभार, राहुल गायकवाड, सुनील कोरके, नागेश गायकवाड, अक्षय सावंत, शुभम पाटील, सनी यांच्यासह नऊ कामगार इमारतीखाली अडकले आहेत. अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, बाला हे घटना घडल्यानंतर इमारतीबाहेर उड्या मारल्याने बचावले.
मोशीतील आदर्शनगर येथील ८१ एकर जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कचरा डेपो आहे. येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प राबविला जातो. त्याचे काम अँथनी लारा या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प, तसेच कंपनीची तीन मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या डोंगरालगतच धोकादायक पद्धतीने उभारण्यात आली होती. सर्व कामगार बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास जेवण्यासाठी कार्यालयातील उपाहारगृहात आले होते. त्या वेळी इमारतीवर कचऱ्याचा उंच डोंगर कोसळला. गेले पाच दिवस सातत्याने पाऊस येत असल्याने त्याचे स्खलन झाले. काही क्षणांत इमारत हजारो टन कचऱ्याखाली दबली. इमारत कोसळली, तेव्हा इमारतीत २३ कामगार होते. इमारत कोसळताच पाच जण तत्काळ बाहेर पडले, तर १८ जण इमारतीखाली अडकले होते. त्यापैकी नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
असे राबवले बचावकार्य
- घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशामक विभाग, एनडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लष्करालाही पाचारण करण्यात आले.
- देहूरोड येथील भारतीय लष्कराचे चार अधिकारी आणि २५ जवान घटनास्थळी आले. बचाव पथकांनी इमारतीची सर्व बाजूंनी पाहणी केली. इमारतीमध्ये माइक, छोटे ड्रोन सोडण्यात आले. माइकद्वारे कामगारांशी संपर्क साधण्यात आला.
- अडकलेल्या कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ नये, याकरिता पाइपद्वारे प्राणवायू सोडण्यात आला.
- इमारतीच्या एका भिंतीला कटरच्या साहाय्याने मोठे भगदाड पाडण्यात आले. पहिल्या मजल्यावरील गज कापून स्लॅब फोडण्यात आले. त्यातून जवान खाली उतरले.
- त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत एका महिलेसह सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांपैकी चार जणांच्या हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. रात्री उशिरा तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
कचरा डेपोची क्षमता संपुष्टात
मोशीतील कचरा डेपोची निर्मिती १९९१ मध्ये झाली. गेल्या ३५ वर्षांपासून शहरातील कचरा येथील ८१ एकर जागेत जमा केला जातो. तेथे आता कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. सन २०१७ मध्ये शहरात प्रतिदिन ८३२ टन कचरा निर्माण होत होता. आता १,५७९ टन कचरा निर्माण होतो. नऊ वर्षांत ७४७ टनांनी कचरा वाढला आहे. मात्र, जागा तेवढीच असल्याने आणि कचरा प्रकल्पाची क्षमता मर्यादित असल्याने कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचून त्याचे डोंगर तयार झाले आहेत.
बचावकार्यावर मंत्र्यांची देखरेख
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन बचावकार्यावर स्वत: देखरेख ठेवली. बचावकार्य कशा पद्धतीने सुरू आहे, याचीही माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनीही घटनास्थळी भेट दिली. ‘दुर्घटनेतील जखमींवर तातडीने आणि प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
