पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोशी दुर्घटनेत नागेश गायकवाड (वय २६) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २३) यांनी बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांना दोन मुली आहेत.
सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी याबाबत माहिती दिली. सोनाली या बुधवारी सायंकाळी एकट्याच घरी होत्या. सातच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजविला. पण, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरवाजा तोडल्यानंतर त्या लटकलेल्या अवस्थेतत दिसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मोशी दुर्घटनेचा ‘एसआयटी’कडून तपास
मोशी कचरा डेपोमध्ये आठ जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले होते. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सैन्य, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने चार दिवस प्रयत्न केले होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अँटोनी लारा रेन्यूएबल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच, राज्य शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून या दुर्घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
मृत कामगारांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून ४० लाखांची मदत
मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ कामगारांच्या कुटुंबीयांना अँटोनी लारा रेन्यूएबल कंपनीकडून प्रत्येकी ४० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च, कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी तसेच कुटुंबीयांचा आरोग्य विमा काढण्याची जबाबदारी कंपनीने स्वीकारली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना महापालिका दहा, राज्य शासन पाच तर कंपनी ४० लाख अशी ५५ लाखांची मदत केली जाणार आहे. महापालिकेने आतापर्यंत सात कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत दिली आहे. दाेन कामगारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना अद्याप मदत देण्यात आली नाही.
