पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर विकसित केल्या जाणाऱ्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका निर्माणाधीन इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. या अपघातात सुमारे १५ ते १६ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी जेवणाची वेळ असल्याने सर्व कर्मचारी कार्यालयाच्या इमरतीत होते अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशामक दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी उपस्थित असून ढिगारा उपसण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे अचूक कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, बांधकाम सुरू असताना अचानक हा सांगाडा कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि त्यांना तातडीने उपचार मिळवून देणे ही आमची पहिली प्राथमिकता असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जसजसे बचाव कार्य पुढे जाईल, तशी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. या घटनेनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा मानकांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोशीतील कचरा डेपोमधील घटना

अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपो येथील कचऱ्याचा डोंगर महापालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून, अग्नशामक दल व आपत्ती व्यवस्थापनाचे जवान पोहोचले आहे. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

दुपारी जेवणासाठी कर्मचारी आले होते कार्यालयात

कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते. या कंपनीचे कार्यालय कचरा डेपोलगतच आहे. दुपारी जेवणासाठी कर्मचारी कार्यालयात आले होते. त्याचवेळी कचऱ्याचा मोठा ढीग कोसळला. हा ढीग कार्यालयावर कोसळल्याने इमारत पडली आहे. कार्यालयात असलेले १५ ते १६ कर्मचारी अडकले आहेत. आत्तापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारत पाडून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे अग्निशामक विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट हे देखील घटनास्थळी उपलब्ध आहेत.

मोशीतील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून ३० लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचरा संकलनातही वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. मोशीतील कचरा डेपोची निर्मिती सन १९१ साली झाली आहे. मागील ३५ वर्षांपासून शहरातील कचरा येथील ८१ एकर जागेत जमा केला जातो. कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. सन २०१७ मध्ये शहरात प्रतिदिन ८३२ टन कचरा निर्माण होत होता. आता एक हजार ५७९ टन प्रतिदिन कचरा निर्माण होत आहे. नऊ वर्षात ७४७ टनांनी कचरा वाढला आहे.