पुणे : आशिया-प्रशांत विभागात कार्यालयीन जागेचा सर्वाधिक खर्च असलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये दिल्ली आणि मुंबईचा समावेश झाला आहे. कार्यालयीन जागेचा वार्षिक खर्च दिल्लीत प्रति चौरस फूट ७३.११ डॉलर (सुमारे ६ हजार ९०० रुपये) तर मुंबईत ६३.८६ डॉलर (सुमारे ६ हजार ५०० रुपये) आहे. आशिया प्रशांत विभागात सर्वाधिक महागडी कार्यालये हाँगकाँमध्ये असून, तिथे हा खर्च १७८.११ डॉलर (सुमारे १६ हजार ९०० रुपये) आहे.

‘नाइट फ्रँक इंडिया’ने आशिया-प्रशांत विभागातील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेचा जून ते सप्टेंबर तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. कार्यालयीन जागेच्या खर्चात भाड्यासह देखभाल, दुरुस्ती, कर, विमा, सुविधा यावरील एकूण खर्चाचा समावेश असतो. या अहवालानुसार, आशिया-प्रशांत विभागात कार्यालयीन जागांचा सर्वाधिक खर्च असलेल्या शहरांमध्ये हाँगकाँग पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर सिंगापूर, सिडनी, सोल, टोकियो, ब्रिस्बेन यांचा क्रमांक असून, दिल्ली सातव्या तर मुंबई आठव्या स्थानी आहे. या यादीत बंगळुरू १९ व्या स्थानी असून, बंगळुरूमध्ये कार्यालयीन जागेचा वार्षिक खर्च प्रति चौरस फूट ३७.१६ डॉलर (सुमारे ३ हजार ५०० रुपये) आहे. मुंबई आणि दिल्लीच्या तुलनेत बंगळुरूत हा खर्च कमी असल्याने तेथील कार्यालयीन जागांची बाजारपेठ तुलनेने परवडणारी ठरली आहे.

यावर्षी तिसऱ्या तिमाहीत दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये कार्यालयीन जागांचे एकूण ७६ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १३.६ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. याचवेळी कार्यालयीन जागांच्या भाड्यात वार्षिक सरासरी वाढ ७.५ टक्के झाली आहे. जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी), कार्यालयीन जागा सहकार्य आणि देशांतर्गत कंपन्यांकडून प्रामुख्याने कार्यालयीन जागांना मागणी आहे. मात्र, त्रयस्थ सेवा देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा कंपन्यांकडून कार्यालयीन जागांना मागणी कमी झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बंगळुरूमध्ये कार्यालयीन जागांच्या भाड्यात सर्वाधिक ११.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. तिथे वार्षिक भाडे प्रति चौरस फूट २ हजार १५ रुपये आहे. दिल्लीत भाड्यात ५.४ टक्के वाढ होऊन ते ४ हजार ४२८ रुपये झाले आहे. मुंबईत भाड्यात ४ टक्के वाढ होऊन ते ४ हजार १११ रुपयांवर पोहोचले आहे. या तिन्ही शहरांमध्ये रिकाम्या कार्यालयीन जागांचे प्रमाण १३ ते १५ टक्क्यांदरम्यान आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगळूरुमध्ये भाड्यातील वाढ अधिक

देशातील प्रमुख शहरांमध्ये कार्यालयीन जागांचे भाडे वाढत आहे. बंगळुरूमध्ये कार्यालयीन जागांना मागणी वाढत असल्याने तिथे भाड्यातील वाढ अधिक आहे. त्या तुलनेत दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयीन जागांची बाजारपेठ परिपक्व असल्याने तिथे भाड्यातील वाढ मध्यम स्वरूपाची आहे, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.