पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त करण्यात आली. शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. कोंढवा परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी बबलू सय्यद हा एका सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत थांबाल असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून बबलूला पकडले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन काडतुसे सापडली. त्याने पिस्तूल कोणाकडून आणले, तसेच कशासाठी बाळगले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव, सहायक निरीक्षक राकेश जाधव, विशाल मेमाणे, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, सुजित मदने, संतोष बनसुडे यांनी ही कामगिरी केली.