scorecardresearch

पुणे: अतिसूक्ष्म उद्योगांत सर्वाधिक व्यवहार रोखीनेच; गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

देशात आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढलेले असताना अतिसूक्ष्म उद्योगांचे (नॅनो एंटरप्राइज) बहुतांश व्यवहार अद्यापही रोखीनेच होत असल्याचे समोर आले आहे.

पुणे: अतिसूक्ष्म उद्योगांत सर्वाधिक व्यवहार रोखीनेच; गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
photo: (Express file) (संग्रहित छायचित्र

चिन्मय पाटणकर
देशात आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे प्रमाण वाढलेले असताना अतिसूक्ष्म उद्योगांचे (नॅनो एंटरप्राइज) बहुतांश व्यवहार अद्यापही रोखीनेच होत असल्याचे समोर आले आहे. अतिसूक्ष्म उद्योजक भांडवलासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींवरच अवलंबून असतात. आर्थिक व्यवस्थापन योग्य नसल्याचा फटका या उद्योजकांना बसत असल्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आले आहेत.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील ‘दे आसरा सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॅनो आंत्रप्रुनरशिप’ने पुणे परिसरातील अतिसूक्ष्म उद्योगांचे सर्वेक्षण केले. दहा लाख ते एक कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या सेवा क्षेत्रातील उद्योगांचा यात समावेश होता. ८३ महिला उद्योजकांसह ५०४ अतिसूक्ष्म उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद साधून अहवाल तयार करण्यात आला. या उद्योगांमध्ये अद्यापही मोठय़ा प्रमाणात रोखीनेच व्यवहार होतात. त्या खालोखाल धनादेश आणि यूपीआयचा वापर केला जातो. या उद्योगांना मनुष्यबळ, वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, देयके वेळेत न मिळणे अशा अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५९ टक्के पदविका किंवा पदवीधर असूनही नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती नसलेल्यांमध्ये त्यांचेच प्रमाण अधिक आहे. नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी कोठून सुरुवात करायची याचीही त्यांना माहिती नाही. ४२१ पुरुष उद्योजकांपैकी ४३ टक्के उद्योजकांनी त्यांना गुंतवणुकीच्या अडचणी येत असल्याचे सांगितले. ९२.५ टक्के उद्योजकांनी उद्योगासाठीचा निधी स्वत: आणि नातेवाईक, मित्रमंडळींकडून घेऊन उभा केला. ७.१ टक्के उद्योजकांना बँकेने मदत केल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

करोना महासाथीचा फटका
करोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका अतिसूक्ष्म उद्योगांना बसला. त्यामुळे अनेकांना बाजारात टिकणेही कठीण झाले. भाडय़ाची रक्कम, कर्जाची परतफेड, कच्च्या मालाचा अभाव, विस्कळीत पुरवठा साखळी, मागणीत घट झाल्याने माल वाया जाण्याचे वाढलेले प्रमाण अशा अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले.
(पूर्वार्ध)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 04:29 IST

संबंधित बातम्या