दौंडजवळ पुन्हा एकदा चोरट्यांनी रेल्वे प्रवाशांवर हल्ला करून त्यांच्याकडील रोकड आणि महागड्या वस्तू लुटून नेल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. पुण्याच्या दिशेने येत असलेल्या हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असलेल्या मायलेकींकडील रोकड चोरट्यांनी पळवून नेली. चोरट्यांचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मायलेकीवर चाकूने हल्लाही करण्यात आला. या प्रकरणी दौंड रेल्वेमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करण्यात येतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे येत असलेली आझाद हिंद एक्स्प्रेस दौंड स्थानकातून बाहेर आल्यावर आऊटरला थांबविण्यात आली होती. त्यावेळी याच गाडीतून प्रवास करीत असलेल्या समीक्षा सिन्हा आणि तिच्या आई यांच्याकडील पर्स आणि इतर ऐवज चोरांनी खिडकीतून चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. समीक्षा सिन्हा आणि त्यांच्या आईने याला प्रतिकार केल्यावर त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्यांची पर्स पळविण्यात आली. त्यांच्या पर्समधील रोकड आणि मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे. नक्की किती रोकड चोरीला गेली याची माहिती मिळालेली नाही. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समजते.
दौंड परिसरात रात्रीच्यावेळी रेल्वे प्रवाशांवर हल्ला करून त्यांना लुटण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत.