पुणे : एका ६ वर्षांच्या मुलीला आठ महिन्यांपासून सातत्याने खोकला येत होता. या काळात पालकांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले. एवढे करूनही खोकला थांबत नव्हता. अखेर एका बालरोगतज्ज्ञाला या खोकल्यामागील अनपेक्षित कारण शोधण्यात यश आले आहे. आई वापरत असलेल्या परफ्यूममुळे मुलीला खोकला येत असल्याचे समोर आले आहे. आईने या परफ्यूमचा वापर थांबविल्यानंतर मुलीचा खोकलाही कमी झाला आहे.

आर्या (नाव बदलले आहे) या मुलीला गेल्या आठ महिन्यांपासून सतत खोकला, रात्री झोपेत खोकल्याची उबळ येणे, घशात खवखव जाणवणे अशा तक्रारी होत्या. विविध तपासण्या, औषधोपचार करूनही खोकला कमी होत नव्हता. कुटुंबाने सुमारे दहा डॉक्टरांना दाखवले. या कुटुंबाने अखेर पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मौनिश बालाजी यांना दाखविले. डॉक्टरांनी तिला औषधे देऊन एक महिन्यानंतर पुन्हा तपासणीसाठी येण्यास सांगितले.

पालकांनी आर्याला महिनाभरानंतर पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात आणले. महिनाभर औषधोपचार करूनही मुलीला फारसा फरक पडला नव्हता. त्या वेळी आर्याची आई डॉक्टरांबरोबर बोलत असताना डॉक्टरांच्या शेजारी उभी असलेली परिचारिका अचानक जोरजोरात खोकायला लागली. आर्याची आई वापरत असलेला परफ्यूम खूप तीव्र होता. त्यामुळेच खोकला येत असल्याचे परिचारिकेने स्पष्ट केले. डॉक्टरांनी आर्याच्या आईला ही बाब समजावून सांगितली आणि मुलीच्या आसपास तो परफ्यूम न वापरण्याचा सल्ला दिला. यानंतर १५ दिवसांनी आर्याला पुन्हा रुग्णालयात आणले त्यावेळी तिचा खोकला जवळजवळ पूर्णपणे बंद झाला होता.

Award Banner

पालकांनी काळजी घ्यावी

तीव्र सुगंधामुळे लहान मुलांच्या श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो आणि सतत खोकला येऊ शकतो. योग्य वेळी उपचार न केल्यास वारंवार खोकला येणे, शाळेत गैरहजर राहणे आणि त्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर दुष्परिणाम होऊ शकतो. परफ्यूम, डिओडरंट, एअर फ्रेशनर, डास प्रतिबंधक स्प्रे, अगरबत्ती आणि सुगंधी डिटर्जंट यामुळे खोकला येऊ शकतो. एखाद्या मुलाला वैद्यकीय कारण नसताना दीर्घ काळ खोकला असेल, तर पालकांनी पर्यावरणीय कारणांचाही शोध घेतला पाहिजे, असा सल्ला डॉ. मौनिश बालाजी यांनी दिला.

मुलांच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको

पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की तीव्र परफ्यूम, रूम फ्रेशनर, अगरबत्ती आणि एरोसोल स्प्रे काही मुलांसाठी खोकल्याचे तीव्र कारण ठरू शकतात. या प्रकरणात औषधे उपयोगी पडली नाहीत, तिथे एका परफ्यूमचा वापर थांबवल्याने डॉक्टरांना उपचारात यश आले, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले.