फग्र्युसन रस्त्यावर महिलेच्या मोटारीने तिघांना उडवले

भांडारकर रस्त्यावरून आपटे रस्त्याच्या दिशेने निघालेल्या मोटारीने फग्र्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौकात एक महिला व मुलीसह तिघांना उडविले.

भांडारकर रस्त्यावरून आपटे रस्त्याच्या दिशेने निघालेल्या मोटारीने फग्र्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौकात एक महिला व मुलीसह तिघांना उडविले. त्याचप्रमाणे दुचाकी व पाच सायकलींनाही धडक दिली. बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मोटार चालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वा साहील पत्की (वय ३०, रा. फ्लॅट ६, वैभवगड, आपटे रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस शिपाई मोहन तुळशीराम सारुक यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वा पत्की या भांडारकर रस्त्यावरून गोखले स्मारक चौक ओलांडून आपटे रस्त्याच्या दिशेने मोटारीने चालल्या होत्या. चौकामध्ये भरधाव मोटारीवरील त्यांचा ताबा सुटला. त्यामुळे मोटार रस्त्याच्या कडेला शिरली. तेथील पाणीपुरी विक्रेत्याला तिने धडक दिली. त्यानंतर एक महिला व मुलीलाही मोटारीने उडविले.
मोटारीची रस्त्यालगत उभ्या केलेल्या दुचाकी व सायकलींनाही धडक बसली. त्यामुळे एक दुचाकी व पाच सायकलींचे नुकसान झाले. सायकलींना धडकून मोटार थांबली. नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. श्रीराम दिंड (वय ३५, रा. भोसरी) या पाणीपुरी विक्रेत्यासह एक महिला व मुलगी जखमी झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Motor accident on apte road

Next Story
‘एफडीए’ला बेकऱ्यांच्या तपासणीचे वेध!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी