मोटार चालविण्याचा परवाना काढण्यासाठी घेण्यात येणारी चाचणी केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या चाचणी मार्गावर घेण्यात येत असल्याने ही चाचणी आता अवघड झाली आहे. त्यामुळे त्यात नापास होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. नापास वाढत असताना त्यांची पुन्हा चाचणी घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. चाचणीत नापास झाल्यास पुन्हा नव्याने ऑनलाईन प्रक्रियेचे दिव्य पार करावे लागत असल्याने अनेकांना वाहन चालविण्याचा पक्का परवाना मिळविण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना मिळविण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. ऑनलाईन अर्ज सादर करतानाच चाचणीसाठी उपलब्ध तारीख निवडावी लागते. उपलब्ध असलेल्या तारखेतून आपण निवडलेल्या तारखेला संबंधित ठिकाणी जाऊन चाचणी द्यावी लागते. नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी ही पद्धत योग्य असली, तरी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परवाना मागणाऱ्यांची संख्या लक्षात घेता त्या तुलनेत यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शिकाऊ परवान्याच्या चाचणीसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार महिने तारीख मिळत नाही. शिकाऊ परवान्याच्या चाचणीच उत्तीर्ण झाल्यास पक्क्य़ा परवान्यासाठी पुन्हा अर्ज करून ऑलनाईन तारीख घ्यावी लागते. तेथेही तीन- चार महिन्यांच्या पुढची तारीख मिळते.
ऑनलाईन यंत्रणेचा हा घोळ सुरू असतानाच पुणे व िपपरी- चिंचवडमधील नागरिकांना मोटार चालविण्याचा परवाना देण्यासाठी आता केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या चाचणी मार्गावर परीक्षा द्यावी लागते. चांगले चालक निर्माण करण्याच्या दृष्टीने हा चाचणी मार्ग अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, त्यामुळे चाचणी अवघड झाली आहे. काही ठराविक गुणांनीही परीक्षार्थी नापास होऊ शकतो. या मार्गावर चाचणी सुरू झाल्यापासून दोन हजाराच्या आसपास परीक्षार्थी नापास झाले आहेत.
चाचणीत नापास झालेल्यांची पूर्वी पुन्हा काही दिवसांनी लगेचच परीक्षा घेतली जात होती. नव्या व्यवस्थेमध्ये मात्र तशी सोय नाही. नापास झालेल्या परीक्षार्थीला पुन्हा ऑनलाईन अर्ज व तारीख घ्यावी लागते. त्यामुळे पुन्हा चाचणी देण्यासाठी संबंधिताला चार ते पाच महिने थांबावे लागते. चाचणीत नापास झालेल्यांची पूर्वीच्याच अर्जानुसार काही दिवसांनी परीक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हा प्रश्न परिवहन विभागाच्याही लक्षात आणून देण्यात आला होता. त्यामुळे चाचणीत नापासांची रविवारी किंवा सुटीच्या दिवशी चाचणी घेण्यात यावी, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या होत्या. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने दिवसेंदिवस नापासांचा आकडा वाढतच चालला आहे.